स्वार्थापुढे नातेसंबंध तुटले; शेतीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 19:39 IST2021-02-11T19:35:40+5:302021-02-11T19:39:42+5:30
Murder in farming dispute : सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले.

स्वार्थापुढे नातेसंबंध तुटले; शेतीच्या वादातून सख्ख्या भावासह जावयाचा खून
उदगीर (जि. लातूर) : उदगीर तालुक्यातील हेर येथे शेतीच्या वादातून भाऊ व त्याच्या जावयाचा खून करण्यात आल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव म्हणाले, हेर येथे सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन भावांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले. यावेळी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप व पूजा जगताप, आश्विनी जगताप, फुलाबाई जगताप, सोजरबाई ढगे यांनी संगनमत करून कुऱ्हाड, कत्ती तलवार, लोखंडी रॉडने गोविंद जगताप यांना जबर मारहाण केली. त्यांना दुचाकीवरून घेऊन जाणारे मयताचे जावई नितीन फावडे व भगवान जगताप यांनाही मारहाण करण्यात आली.
यात नितीन फावडे हे गंभीर जखमी झाले. गोविंद जगताप यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेले मयताचे जावई नितीन फावडे यांना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले होते, मांत्र त्यांचाही मृत्यू झाला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक उदगिरात...
शेतीच्या वादातून खून झाल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात घटनेची माहिती घेतली जात असून रात्री गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ठाण्यात बसून आहेत.