धक्कादायक! डोक्यात दगड घालून मूकबधीर मुलाचा खून, झाडाझुडपात आढळला मृतदेह
By हरी मोकाशे | Updated: June 20, 2024 19:55 IST2024-06-20T19:55:11+5:302024-06-20T19:55:23+5:30
येलदरवाडीची घटना : एकाविरुध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! डोक्यात दगड घालून मूकबधीर मुलाचा खून, झाडाझुडपात आढळला मृतदेह
किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी येथील एका १३ वर्षीय भोळसर व मूकबधीर शालेय मुलास गावानजिकच्या झाडाझुडुपातील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुकेश ऊर्फ गोटू गोविंद गित्ते (१३, रा. येलदरवाडी, ता. अहमदपूर) असे मयत मुलाचे नाव आहे. येलदरवाडीतील रुकेश ऊर्फ गोटू गित्ते हा भोळसर व मूकबधीर होता. तो अहमदपुरातील एका मूकबधीर विद्यालयात पाचवी वर्गात शिक्षण घेत होता. बुधवारी अचानकपणे तो गावातून गायब झाला. कुटुंबियांसह नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही.
दरम्यान, गुरुवारी सकाळी गावाशेजारील शेतातील झाडा-झुडुपांच्या ओढ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, सहायक फौजदार चंदू गोखरे, सुनील श्रीरामे, किशोर सोनवणे, तोपरपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने रुकेशच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारुन खून केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ज्ञानोबा रंगनाथ गित्ते यांच्या फिर्यादीवरून योगेश तुकाराम केंद्रे (रा. येलदरवाडी, ता. अहमदपूर) याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.