धक्कादायक; जप्त सव्वा कोटींच्या मुद्देमालापैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 19:01 IST2022-01-21T19:01:39+5:302022-01-21T19:01:53+5:30
एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून १३ जणांची चाैकशी करण्यात येत आहे

धक्कादायक; जप्त सव्वा कोटींच्या मुद्देमालापैकी ४० लाखांच्या गुटख्याची चाेरी !
लातूर : एका धाडसत्रात जप्त करण्यात आलेल्या जवळपास सव्वा काेटी रुपयांच्या मुद्देमालापैकी तब्बल ४० लाखांचा गुटख्याची चाेरी केल्याचे समाेर आले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १३ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चाैकशी सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, १० ऑक्टाेबर २०२१ राेजी अन्नसुरक्षा अधिकाऱ्याचे फिर्यादीवरून एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुरनं. ६३५/२०२१ कलम २७२, २७३, ३२८, ३४ भादंवि, अन्नसुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये ८४ लाख रुपयाचा गुटखा जप्त केला होता. तर एमआयडीसीमध्ये जप्त केलेला मुद्देमाल अधिकचा असल्याने ताे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यासाठी पाेलिसांनी त्याच ठिकाणी ठवेून गाेदामाला सील करुन ठेवण्यात आला होता. या मुद्देमालाची विल्हेवाट तथा नष्ट करण्यासाठी न्यायालयाचा आदेश आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अन्नसुरक्षा अधिकारी, त्याचबराेबर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाेदाम उघडले.
यावेळी गाेदामात जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल कमी असल्याचे आढळून आले. पोलीस ठाण्याकडे असलेल्या नाेंदीनुसार मुद्देमालाची पाहणी केली असता, ४० लाख १५ हजारांचा मुद्देमाल गाेदामाच्या एका कोपऱ्यातील पत्रा उचकटून चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत एमआयडीसी ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चाैकशी सुरु आहे. आता त्यांच्याकडून चाेरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुुरु आहे.
अहमदपूरच्या व्यापाऱ्याकडून खरेदी...
अहमदपूर येथील एका व्यापाऱ्याकडून चाेरी केलेला बहुतांश मुद्देमाल खरेदी केला जात हाेता, असे चाैकशीत समाेर आले आहे. तेरा जणांच्या टाेळीत तीन महिला, दुकानादार आणि इतरांचा समावेश असून, त्यांची चाैकशी सुरु आहे. या टाेळीतील बहुतांश चाेरटे हे लातूर जिल्ह्यातील असून, उर्वरित काहीजण पंढरपूर आणि पुणे येथील आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर