घरकुल बांधकामात शिरुर अनंतपाळ जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST2021-08-18T04:25:48+5:302021-08-18T04:25:48+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १३६१, प्रधानमंत्री आवास योजनेतून ...

घरकुल बांधकामात शिरुर अनंतपाळ जिल्ह्यात अव्वल
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १३६१, प्रधानमंत्री आवास योजनेतून १७२, तर शबरी आवास योजनेतून १०९ घरकुल मंजूर करण्यात आले होते. या घरकुलाचा लाभ लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावा यासाठी चालू वर्षात आवास अभियान राबविण्यात आले. या अभियानात शिरूर अनंतपाळ पंचायतीने सहभाग घेऊन अभियान कालावधीत कमी वेळात अधिक घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुका जिल्ह्यात अव्वल आला आहे. अभियान कालावधीत समितीमार्फत मूल्यांकन करून गुण देण्यात आले आहेत. यामध्ये राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत ४४.९ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. यासाठी गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, कक्ष अधिकारी बादने, सुलोचना जोगदंड, सभापती डॉ. नरेश चलमले, उपसभापती उद्धव जाधव यांनी पाठपुरावा करून अभियान कालावधीत घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात उपसभापती उद्धव जाधव, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांचा प्रशस्तिपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तालुक्याला आवास योजनेत दुहेरी यश...
शिरूर अनंतपाळ तालुका राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात अव्वल आला असून, प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्याला जिल्ह्याचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आवास अभियान योजनेत तालुक्याला दुहेरी यश मिळाले असून, एकाच वेळी प्रथम आणि तृतीय येण्याचा मान मिळाला आहे.
एक हजार ३२० घरकुलांचे काम पूर्ण....
शिरूर अनंतपाळ तालुक्यात शासनाच्या प्रधानमंत्री, रमाई, तसेच शबरी आवास योजनेंतर्गत १ हजार ६४२ घरकुल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी पंचायत समिती अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे १ हजार ३२० घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
उर्वरित ३२२ घरकुल लवकरच होणार...
तालुक्यात शासनाच्या विविध घरकुल योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या १६४२ घरकुलांपैकी १३२० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३२२ घरकुलांची किरकोळ कामे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे त्यांचेसुद्धा बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे कक्ष अधिकारी बादने यांनी सांगितले.