अन्न-पाण्याच्या शाेधात मेंढपाळ नागरसाेगा शिवारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST2021-01-02T04:16:51+5:302021-01-02T04:16:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागरसोगा : अन्न-पाण्याच्या शाेधात मजल दरमजल करत मेंढपाळांचे कळप औसा तालुक्यातील नागरसाेगा परिसरात दाखल झाले आहेत. ...

अन्न-पाण्याच्या शाेधात मेंढपाळ नागरसाेगा शिवारात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागरसोगा : अन्न-पाण्याच्या शाेधात मजल दरमजल करत मेंढपाळांचे कळप औसा तालुक्यातील नागरसाेगा परिसरात दाखल झाले आहेत. जिथे हिरवळ दिसेल तिथे हे मेंढपाळ मुक्काम करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्यातील हे मेंढपाळ असून, मराठवाड्यात यावर्षी माेठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली. परिणामी, शेतशिवारातील नदी-नाले, विहिरी, साठवण तलाव, लघु आणि मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. याच पाण्यावर रब्बीच्या हंगामातही शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणावर पेरा घेतला आहे. मराठवाड्यातील हे चित्र पाहून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, काेल्हापूर आणि साेलापूर जिल्ह्यातील मेंढपाळांचे कळप आता टप्प्याटप्प्याने मराठवाड्यातील गावागावात दाखल हाेत आहेत. शिखर शिंगणापूर, म्हसवड परिसरातील मेंढपाळ आणि त्यांचा कबिला औसा तालुक्यातील नागरसाेगा शिवारात अन्न-पाण्याच्या शाेधात दाखल झाला आहे.
दिवाळीचा सण झाल्यानंतर प्रामुख्याने हे मेंढपाळ आपले घरदार साेडून भटकंतीला निघतात. मेंढ्यांसाेबत संसाराेपयाेगी साहित्य कोंबड्या, लहान मुले, कोकरु आणि जीवनावश्यक वस्तू घोड्यावर लादून मेंढपाळ भटकंतीला बाहेर पडले आहेत. घाेड्याच्या पाठीवर आपलं बिऱ्हाड घेऊन नागरसाेगा शिवारात मुक्कामाला दाखल झाले आहेत.