जिल्ह्यातील ४४८ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:12+5:302021-06-28T04:15:12+5:30
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तीन महिन्यांच्या करारावर आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या ओसरत ...

जिल्ह्यातील ४४८ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तीन महिन्यांच्या करारावर आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या ओसरत असल्याने त्यांना सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून, गरज संपताच सेवेतून कमी केले. आता आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.
जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले - ७००
कितीजणांना कमी केले - ४४८
सध्या कार्यरत - २५२
शासनाच्या निर्देशानुसार निर्णय
कोरोनाच्या संसर्ग काळात राज्य शासनाच्या निर्देशानुसार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे सेवा थांबविण्यात आली आहे. सध्या २५२ कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णसेवा आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर सेवा थांबविलेल्यांना परत सेवेत घेतले जाईल. - डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर.
गरज सरो, वैद्य मरो असे होऊ नये
कोरोना काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. जीवाला धोका असतानाही सेवा बजावली. मात्र आता गरज संपताच सेवेतून कमी केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील नियुक्त पदांवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी आहे.
- शिवकुमार बुलबुले
यापूर्वी पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची सेवा बजावली, तेव्हाही कमी करण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना परत बोलावण्यात आले. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने सेवा खंडित करण्यात आली, हे चुकीचे असून सेवेत कायम करण्याची मागणी आहे.
- अनिकेत मुंडे
कोरोनाच्या संकटकाळात कोणतेही कारण न देता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावर मात करीत आरोग्य सेवा बजावली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेत कायम करावे आणि आम्हाला दिलासा द्यावा. - गणेश फड