तीन वर्षांनंतर बदलली चारचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:27+5:302021-06-28T04:15:27+5:30
एमएच २४ ए. डब्ल्यू या क्रमांकाची मालिका २४ जून रोजी संपली आहे. त्यामुळे आता मंगळवारपासून नवीन मालिका परिवहन संकेतस्थळावर ...

तीन वर्षांनंतर बदलली चारचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका
एमएच २४ ए. डब्ल्यू या क्रमांकाची मालिका २४ जून रोजी संपली आहे. त्यामुळे आता मंगळवारपासून नवीन मालिका परिवहन संकेतस्थळावर येणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेली वाहन क्रमांकाची मालिका एमएच २४ बीएल या नावाने असणार आहे. यासाठी मंगळवारपासून अर्ज करता येणार आहे. ग्राहकांना पसंती क्रमांक मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुल्क भरणा करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांत प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या दहा हजार चारचाकी संवर्गातील वाहनांत सर्वाधिक कारचा समावेश आहे. त्यात कारची संख्या ९ हजारांच्या जवळपास आहे, तर जेसीबी व ट्रॅक्टर ट्रेलरची संख्या १ हजारांच्या आसपास आहे. पसंती, आकर्षक क्रमांकाची मागणी कारला अधिक असल्याने काहीजण नवीन मालिकेची वाट पाहून होते.
राष्ट्रीयीकृत बँकेचाच धनादेश...
लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून चारचाकी वाहनांच्या नंबरची बीएल ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत ग्राहकांना पसंती क्रमांक, आकर्षक क्रमांक घेता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नंबर तपासणी करून त्यासाठी लागणारे शुल्क राष्ट्रीयीकृत बँकेचा डीडी काढून कार्यालयात जमा करावा लागणार आहे. सोबत मतदान कार्ड, बँक पासबुक, विमा पॉलिसी, लाईट बिल जोडावे लागणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
तर लिलाव करावा लागेल...
पसंतीक्रमांकासाठी शासनाने शुल्क निश्चित केले आहेत, एकाच क्रमांसाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास संबंधित अर्जदारांना कार्यालयात बोलावून घेतले जाते. त्यानंतर त्या क्रमांकाचा लिलाव केला जातो, जो वाहनधारक अधिक शुल्क देईल, त्यांना तो क्रमांक दिला जातो. यातून शासनाच्या महसुलात भर पडण्यास मदत होते. शिवाय, ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार वाहनांना क्रमांकही मिळतो, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.