बचत गटाच्या कर्जाची वसूली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:10+5:302021-06-03T04:15:10+5:30

शहरातील बंद असलेले सिग्नल सुरू करा लातूर : शहरातील मुख्य चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना ...

Self-help group debt recovery should be stopped | बचत गटाच्या कर्जाची वसूली थांबवावी

बचत गटाच्या कर्जाची वसूली थांबवावी

शहरातील बंद असलेले सिग्नल सुरू करा

लातूर : शहरातील मुख्य चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गांधी चौक, रेणापूर नाका, बार्शी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाच नंबर चौक आदी भागांत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, सिग्नल बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्याकडे शहर वाहतूक शाखेने तात्काळ लक्ष देऊन सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी

लातूर : शहरातील बार्शी राेडवर माेठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. त्यात अवजड वाहनांचाही समावेश आहे. मात्र, या बार्शी रोडवर एकाही ठिकाणी गतिरोधक नाही. परिणामी, वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, या मार्गावर विविध महाविद्यालये, शाळा असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या मार्गावर तत्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. याबाबत निवेदनही देण्यात आली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी

लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात नियमित स्वच्छता केली जात नसल्याची स्थानिक नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, नियमित घंटागाडी येत नसल्याने अनेक जण रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत तसेच मोकळ्या प्लॉटवरही कचरा टाकला जात आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देऊन या परिसरात घंटागाडी सुरू करावी, तसेच कचऱ्याचे नियमित संकलन करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

बांधकाम मजुरांना मदतीमुळे मिळाला आधार

लातूर : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाखाहून अधिक नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक बांधकाम कामगार असून अनेकांचे कामगार विभागाकडे नाेंदणी नाही. त्यामुळे सदरील मजूर लाभापासून वंचित राहिले आहेत. शासनाने सरसकट बांधकाम कामगारांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.

दुपारी दोननंतर फिरणाऱ्यांची चाचणी

लातूर : गांधी चौक येथे महानगरपालिका आणि गांधी चौक पोलीस स्टेशनच्या पथकाकडून दुपारी दोननंतर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय हिबारे, झोनल अधिकारी बंडू किसवे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोईनवाड, लोंढे आदींसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात वाहनांचा परिवहन कर थकला

लातूर : जिल्ह्यात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर पाच कोटींचा परिवहन कर थकला आहे. या कराच्या वसुलीसाठी कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिले आहेत. २०१० पासून परिवहन तसेच पर्यावरण कर लागू केला आहे. ज्यांनी हे दोन कर भरले नाहीत. त्यांच्याकडून कर वसूल केला जाणार आहे. ज्या वाहनाच्या नोंदणीला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ज्यांना ८ वर्ष पूर्ण झाले आहेत, अशा वाहनांकडून पर्यावरण कर वसूल केला जाणार आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण

लातूर : एक गाव-एक वाण या उपक्रमातंर्गत जळकोट तालुक्यातील जगळपूर येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला. पेरणीपूर्व मशागत, सोयाबीन उगवण तपासणी, बीज प्रक्रिया, दहा टक्के रासायनिक खतांचा वापर, रूंद सरी वरंबा, सोयाबीन पेरणी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडल अधिकारी नीलम बोरकर, उल्हास पाटील, अभिलाश क्षीरसागर, सुधाकर कांबळे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

वृक्षलागवडीच्या चळवळीत सहभाग नोंदवा

लातूर : जिल्ह्यात वृक्षलागवड चळवळ उभी करण्यासाठी वृक्षप्रेमी नागरिक, संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अरविंद लाेखंडे यांनी येथे केले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवारी वृक्षलागवड पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, लातूर ग्रीनवृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, वनश्री मित्रमंडळाचे ईश्वर बाहेती, वृक्षप्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, बी. एम. काळूंखे यांची उपस्थिती होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. त्यामध्ये संस्था, संघटनांनी सहभाग नोंदवावा.

साकेब उस्मानी यांना एम.फील प्रदान

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात साकेब अब्दुल हकीम उस्मानी यांनी एम.फील पदवी प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या लातूर येथील उपकेंद्रातील प्रा. डॉ. प्रमोद एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानी यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि त्यामुळे शेतक-यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम या विषयावर त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. या यशाचे कौतुक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक आर. एस. शिंदे, डॉ.संभाजी माने, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. निशिकांत वारभुवन, डॉ. बी. एल. बोईवाड, अनंत शिंदे, रफिक शेख यांनी कौतुक केले.

Web Title: Self-help group debt recovery should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.