मानधन थकल्याने वृद्ध कलावंतांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:58+5:302021-02-09T04:21:58+5:30
लातूर : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन नोव्हेंबरपासून थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ८०० ...

मानधन थकल्याने वृद्ध कलावंतांची ससेहोलपट
लातूर : राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन नोव्हेंबरपासून थकीत राहिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील ८०० वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. मानधनासाठी या कलावंतांचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सातत्याने चौकशीसाठी हेलपाटे होत आहेत.
साहित्य व कला क्षेत्रासाठी ज्यांनी १५ ते २० वर्षे महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे, ज्या कलावंत, साहित्यिकांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतांसाठी राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मानधन योजना राबविण्यात येते. या योजनेत तीन स्तर करण्यात आले असून, राष्ट्रीय पातळीवरील कलावंत, साहित्यिकास २ हजार १००, राज्य पातळीवरील कलावंतास १ हजार ८००, तर जिल्हा पातळीवरील वृद्ध साहित्य, कलावंतास मासिक दीड हजार रुपये मानधन देण्यात येते.
शासनाच्या या योजनेमुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाहासाठी काही प्रमाणात मदत होत आहे. जर साहित्यिक, कलावंताचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीस अथवा पतीस तहहयात असेपर्यंत मानधन देण्यात येते. या मानधनाची रक्कम मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून थेट कलावंतांच्या खात्यावर जमा करण्यात येते. मात्र, नोव्हेंबरपासून अद्यापही या कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा झाले नाही.
कोरोनाच्या संकटामुळे वृद्ध साहित्यिक, कलावंतांना घराबाहेर पडणे अशक्य ठरत आहे, तर राज्य शासनाकडून मानधन देण्यात आले नसल्याने काही कलावंतांसमोर उदरनिर्वाहासह विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे कलावंत सातत्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे चौकशी करीत आहेत. मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट होत आहे.
जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा...
पूर्वी जिल्हा परिषदेमार्फत कलावंतांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येत होते. मात्र, आता थेट मुंबईच्या संचालक कार्यालयाकडून मानधन जमा करण्यात येत आहे. आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्या कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात येत आहेत. तसेच आमचाही पाठपुरावा सुरू आहे.
- सुनील खमितकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी.
पैसे नसल्याने लाभार्थ्यांची अडचण...
कोरोनाच्या संकटापासून नियमितरीत्या खात्यावर मानधन जमा होत नाही. आतातर नोव्हेंबरपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे आजारपण आल्यानंतर दवाखान्यात उपचार घ्यावे म्हटले तर पैसे नसल्याने उपचारही घेता येत नाहीत. काही वेळेस उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे एका वृद्ध साहित्यिक, कलावंताने सांगितले.