बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST2021-02-16T04:21:00+5:302021-02-16T04:21:00+5:30
बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई ...

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
बँकेतील ११४५ शाखातून सफाई कर्मचारी नेमलेले नाहीत तर ६४५ शाखेत शिपाई नेमलेले नाहीत. यातील ३६० शाखातून सफाई कर्मचारी तसेच शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत, याचा बँकेच्या ग्राहक सेवेवर विपिरित परिणाम होत असून ग्राहकांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय सरकार आता बँकातून प्रधानमंत्री जीवन विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री वय वंदन योजना, मुद्रा योजना, स्टॅन्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम बँकेमार्फत राबवत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कर्मचार्यांना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी फक्त एक दिवसाची देखील रजा घेता येत नाही. याबरोबरच बँकेने शाखा तसेच एटीएम वर नेमलेले सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. व्यवस्थापन शिपाई ते क्लार्क तसेच क्लार्क ते अधिकारी पदोन्नतीत देखील चालढकल करत असल्याचा आरोप कॉ.धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे.
निदर्शने, धरणे आणि संप
२३ फेब्रुवारी रोजी सर्व शाखांसमोर निदर्शने, २६ रोजी झोनल ऑफिसेस पुढे धरणे तर सहा मार्चला महा बँकेचे मुख्य कार्यालय पुणे येथे संघटनेतर्फे महा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे ज्यात देशभरातील पाचशेवर कर्मचारी सहभागी होतील आणि एवढे करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सन्माननीय तोडगा निघाला नाही तर महा बँकेतील एआईबीइएचे सहा हजारावर सभासद १२ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करतील, असे कॉ. कुलकर्णी म्हणाले.