सालगड्याचा वार्षिक पगार लाखाच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:24+5:302021-04-13T04:18:24+5:30

धनेगाव बॅरेजेस, अनंतवाडी आणि दरेवाडी साठवण तलावामुळे वलांडीसह परिसरात सिंचनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उसाचे प्रमाण वाढले ...

Salgadya's annual salary is over Rs | सालगड्याचा वार्षिक पगार लाखाच्या वर

सालगड्याचा वार्षिक पगार लाखाच्या वर

धनेगाव बॅरेजेस, अनंतवाडी आणि दरेवाडी साठवण तलावामुळे वलांडीसह परिसरात सिंचनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उसाचे प्रमाण वाढले आहे, तसेच बहुतांश शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. ऊस लागवडीवर भर असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी व मजूरही परिसरातील कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी जातात. त्यामुळे सालगड्याची वाणवा निर्माण झाली आहे.

गुढीपाडवा हा शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष असते. या दिवशी शेतकरी सालगड्यांची नियुक्ती करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतीसह सर्वच व्यवहार ठप्प होत आहेत, तसेच शेतातील कामासाठी मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे या भागात परजिल्ह्यातून मजूर आणावे लागतात. आता सालगडी मिळत नसल्याने बळीराजापुढे संकट निर्माण झाले आहे. परजिल्ह्यातून पती-पत्नीची जोडी सालगडी म्हणून ठेवण्यावर शेतकरी भर देत आहे. एकीकडे सालगडी म्हणून राहिल्यास वर्षभर एकाच ठिकाणी राहावे लागते. त्यामुळे सालगडी म्हणून नको, अशी भूमिका मजुरांची आहे.

तोड पद्धतीने शेतीवर भर...

सालगड्याची वाणवा असल्याने, बहुतांश मोठे शेतकरी शेती बारदान मोडीत काढून दोन- तीन वर्षांच्या करारावर तोड पद्धतीने शेती देण्यावर भर देत आहेत. मोसमी कामाच्या दिवसांत मजुरांची टंचाई जाणवते. त्यामुळे शेती कामे होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते.

शेतीकामाची अडचण...

परिसरातील मजूर सालगडी म्हणून ठेवल्यास वर्षभर शेती कामे करताना, अनेक अडचणी निर्माण होतात. लाख रुपये देऊनही सालगडी मनमानी करतात. त्यामुळे ऐन वेळी शेती कामे खोळंबतात. त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे परजिल्ह्यातील सालगडी नाईलाजाने आणावे लागतात, असे येथील प्रयोगशील शेतकरी सुरेंद्र अंबुलगे म्हणाले.

गुढीपाडव्यापासून सालगडी हे शेतकऱ्यांच्या कामावर रुजू होतात, परंतु शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्रॅक्टरद्वारे व यांत्रिकीकरणाद्वारे करावी लागत आहेत. त्यामुळे शेती खर्च परवडत नाही. तरुण वर्ग कष्टाची कामे करण्यास धजावत नाही. परिणामी, ग्रामीण भागात मजुरांची टंचाई जाणवत आहे, असे प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर महाजन म्हणाले.

Web Title: Salgadya's annual salary is over Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.