दोन वर्षांपासून शैक्षणिक साहित्य विक्री थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:54+5:302021-07-30T04:20:54+5:30
हाळी हंडरगुळी : जून महिना उजाडला की पालकांसह बालकांना शाळेचे वेध लागतात. वह्या, पुस्तके, बॅग व इतर शैक्षणिक साहित्य ...

दोन वर्षांपासून शैक्षणिक साहित्य विक्री थंडावली
हाळी हंडरगुळी : जून महिना उजाडला की पालकांसह बालकांना शाळेचे वेध लागतात. वह्या, पुस्तके, बॅग व इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी झुंबड असते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू न झाल्याने शैक्षणिक साहित्य विक्रीला ब्रेक लागला आहे.
शैक्षणिक सत्राची सुरुवात जून महिन्यात होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झालेली शाळा विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असते. काही शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात असतात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पैसे राखून ठेवतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा भरू शकल्या नाहीत. परिणामी, शैक्षणिक साहित्याची उलाढाल थांबली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोना रुग्ण नसलेल्या ग्रामीण भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले. परंतु, पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. शहरातील शाळांचे कोणतेही वर्ग सुरू नाहीत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी थंड असल्याचे पहावयास मिळत आहे.
हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने परिसरातील १५ ते २० गावांतील नागरिक येथे बाजारासाठी येतात. त्यामुळे येथे आर्थिक उलाढाल होत असते. जून महिन्यात काहीजण शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय सुरू करतात. याशिवाय, रविवारच्या आठवडी बाजारातही वह्या, पुस्तके विक्रीसाठी येतात. पण शाळा बंद असल्याने शैक्षणिक साहित्याला मागणी नाही. परिणामी, आर्थिक उलाढाल थंडावली असल्याचे पहावयास मिळत आहे.
आर्थिक उलाढाल ठप्प...
दरवर्षी जून ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत शैक्षणिक साहित्य विक्री होत असते. या कालावधीत येणाऱ्या रविवारच्या बाजारात ४० ते ५० हजार रुपयांची शैक्षणिक साहित्य विक्री होते. पण, दोन वर्षांपासून विक्रीच नाही.
- दिलीप स्वामी, विक्रेता, हंडरगुळी