संत कबीरांनी मानवाला विवेकवादी बनवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:13+5:302021-06-27T04:14:13+5:30
संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या ...

संत कबीरांनी मानवाला विवेकवादी बनवले
संत कबीर प्रतिष्ठान, लातूर व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे वृक्षारोपण व कबीरांची भाव भूमी व वैचारिक भूमी या विषयावर हैदराबाद येथील डॉ. रवी रंजन यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी संत कबीर प्रतिष्ठानचे संस्थापक-सचिव डॉ. रणजित जाधव होते. हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे सहसंचालक सचिन निंबाळकर, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. दिलीप गुंजरगे, उपाध्यक्ष प्रा. राजेश विभुते, प्रा. तानाजी भोसले, विजय चव्हाण, विवेक सौताडेकर, डॉ. संतोष कुलकर्णी, प्राचार्य गणपत माने उपस्थित होते.
यावेळी डॉ. रंजन म्हणाले, मनुष्याची ओळख गुणात्मक कर्माने व मानवतेने व्हावी. आज मनुष्याची ओळख जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ग, वर्ण, रंगाच्या आधारावर होत असेल, तर कबीर म्हणतात, ही आधुनिकता असू शकत नाही. कबीरांनी संपूर्ण मानव मात्राला प्रेमाच्या धाग्यात बांधले. कबीरांचे किंवा संत कवीचे प्रेम नि:स्वार्थ, निष्कलंक, निष्कपट, निश्चल, पवित्र, सत्याचा अवलंब करणारे असावे, हाच खरा पुरुषार्थ होय. प्रेमानेच सकल सृष्टी सुखी, आनंदी हाईल.
अध्यक्षीय समारोपात डॉ. जाधव म्हणाले, भारतात जेवढे संत झाले, त्यात कबीर क्रांतिकारक कवी होऊन गेले. कबीर वैदिक परंपरेपेक्षा श्रमिक परंपरेचे पुरस्कर्ते होते. श्रमानेच ईश्वर प्राप्ती होते, असे विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. दिलीप गुंजरगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते, तर आभार डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मानले.
कॅप्शन : संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त श्री विद्यालय, लातूर येथे कबीर प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. रणजित जाधव, सचिव प्रा दिलीप गुजरंगे, प्रा राजेश विभुते, प्रा तानाजी भोसले, श्री विवेक सौताडेकर, प्रा. विजय चव्हाण, प्राचार्य गणपत माने.