उदगीर (जि. लातूर) : येथील बिदर रोडवरील एका मंगल कार्यालयाशेजारील नालीत बुधवारी सकाळी ५०० रुपयांच्या नोटा नालीत वाहत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, ही घटना शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून काही नोटा ताब्यात घेतल्या.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, बुधवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास बिदर रोडवरील रघुकुल मंगल कार्यालयाशेजारील नालीतून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून जात असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांनी तिकडे धाव घेतली. दरम्यान, ही घटना समजल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ५०० रुपयांच्या नोटा नालीत आढळल्या. पोलिसांनी त्या नोटा बाहेर काढून ताब्यात घेतल्या. त्या पोलीस ठाण्यात आणून नोटा खऱ्या आहेत की नाहीत, याची खात्री करुन घेण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तेव्हा या नोटा खऱ्या असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
यातील काही नोटांना वाळवी लागली आहे तर काही नोटा फाटलेल्या आणि भिजलेल्या अवस्थेत होत्या. या नोटा नेमक्या या परिसरात कशा आल्या, कोणी टाकल्या अथवा कोणाच्या घरातून वाहून नालीत आल्या, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.नोटांना वाळवी, फाटक्या...याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे म्हणाले, ही घटना सत्य असून सर्व नोटा या चलनातील असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून खातरजमा करुन घेतली आहे. पोलिसांनी ६ नोटा ताब्यात घेतल्या आहेत. परंतु, या सर्वच नोटांना वाळवी लागली आहे तर काही नोटा फाटलेल्या व भिजलेल्या अवस्थेत आहेत.
बघ्यांची मोठी गर्दी...नालीतून नोटा वाहत असल्याने त्या बनावट असाव्यात असा काहींच्या मनात संशय निर्माण झाला. त्यामुळे ते नोटा वाहत असताना पाहत थांबले होते. त्यामुळे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. पोलीस दाखल होताच बघेही गायब झाले.