चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा नाल्यात आढळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:28+5:302021-07-15T04:15:28+5:30

उदगीर (जि. लातूर) : शहरातील बिदर रोडवरील एका मंगल कार्यालयाशेजारील नाल्यात बुधवारी सकाळी चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा वाहत ...

Rs 500 notes in circulation were found in the nala | चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा नाल्यात आढळल्या

चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा नाल्यात आढळल्या

उदगीर (जि. लातूर) : शहरातील बिदर रोडवरील एका मंगल कार्यालयाशेजारील नाल्यात बुधवारी सकाळी चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा वाहत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, ही घटना उदगीर शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून १० नोटा ताब्यात घेतल्या.

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, बुधवारी सकाळी १०.३०च्या सुमारास बिदर रोडवरील रघुकुल मंगल कार्यालयाशेजारील नाल्यातून चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा वाहून जात असल्याचे काही नागरिकांना दिसले. ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी नोटा पाहण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, ही माहिती समजल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ५०० रुपयांच्या नोटा नाल्यात आढळल्या. पोलिसांनी त्या नोटा बाहेर काढून ताब्यात घेतल्या. पोलीस ठाण्यात आणून या नोटा खऱ्या आहेत की नाहीत, याची खात्री करुन घेण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तेव्हा या नोटा खऱ्या असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

यातील काही नोटांना वाळवी लागली आहे तर काही नोटा फाटलेल्या आणि भिजलेल्या अवस्थेत होत्या. या नोटा नेमक्या या परिसरात कशा आल्या, कोणी टाकल्या अथवा कोणाच्या घरातून वाहून नाल्यात आल्या, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

नोटांना वाळवी, फाटक्या...

याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे म्हणाले, ही घटना सत्य असून, सर्व नोटा या चलनातील असल्याची बँक अधिकाऱ्यांकडून खातरजमा करुन घेतली आहे. पोलिसांनी ५ हजार रुपयांच्या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. परंतु, या सर्वच नोटांना वाळवी लागली आहे तर काही नोटा फाटलेल्या व भिजलेल्या अवस्थेत आहेत.

२०-२५ हजारांच्या नोटा नेल्या...

नाल्यातून नोटा वाहत असल्याचे दिसल्याने काहीजणांना धक्काच बसला आणि नाल्यातून नोटा वाहत आहेत, अशी आरडाओरड सुरु झाली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि हाताला लागतील त्या नोटा मिळविण्याचा प्रयत्न सुरु झाला. सुमारे १०-१२ जणांनी २० ते २५ हजारांच्या नोटा नेल्या असतील, असे तेथील प्रत्यक्षदर्शी दुकानदारांनी सांगितले.

एकूण ३० ते ३५ हजारांचा अंदाज...

चलनातील या ५०० रुपयांच्या नोटांना घडी पडली होती. त्यामुळे नोटा ठेवण्याच्या पध्दतीवरुन एकूण नोटा ३० ते ३५ हजार रुपयांच्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. काही नोटांचे तुकडे पडल्यामुळे त्या जुळत नसल्याचेही सांगितले.

बघ्यांची मोठी गर्दी...

दरम्यान, नाल्यातून वाहत असलेल्या नोटा ह्या बनावट असाव्यात, असा संशय काहींच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे ते नोटांकडे पाहत थांबले होते. बघ्यांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. पोलीस येताच बघेही गायब झाले.

सोबत फोटो...

१. १४ एलएचपी उदगीर १ : नाल्यात आढळलेल्या ५०० रुपयांच्या चलनातील नोटा.

२. १४एलएचपी उदगीर २ : उदगीर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नोटांची बँक अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन घेण्यात आली.

Web Title: Rs 500 notes in circulation were found in the nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.