तेरणा नदी वाहू लागली, पाच दिवसांत १२४ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:36+5:302021-07-11T04:15:36+5:30
औराद शहाजानी : औराद शहाजानीसह परिसरात गत आठवड्यापासून जाेरदार पाऊस होत आहे. शनिवारी सकाळी ८ वा. पर्यंत ५१.४ मिमी ...

तेरणा नदी वाहू लागली, पाच दिवसांत १२४ मिमी पाऊस
औराद शहाजानी : औराद शहाजानीसह परिसरात गत आठवड्यापासून जाेरदार पाऊस होत आहे. शनिवारी सकाळी ८ वा. पर्यंत ५१.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जुलैच्या पाच दिवसांत १२४ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, तेरणा नदीवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे भरुन वाहत आहेत. त्यामुळे अतिरिक्त पाणी साेडून देण्यात आले आहे. मांजरा नदीवरील हाेसूर बंधाराही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
मृग नक्षत्र निघाल्यानंतर जूनमध्ये दाेनदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदी होऊन पेरणी करण्यास सुरुवात केली. पिकेही चांगली उगवली, परंतु, मध्यंतरी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. जुलैमध्ये पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. जुलैच्या पाच दिवसांत १२४ मिमी पाऊस झाला आहे. तेरणा नदीपात्रानजीक सतत पाऊस होत असल्याने नदी वाहू लागली आहे. तसेच परिसरातील ओढे, नाले वाहू लागले आहेत.
तेरणावरील औराद, तगरखेडा, गुजंरगा, मदनसुरी, लिंबाळा, किल्लारी, राजेगाव हे उच्चस्तरीय बंधारे भरले आहेत. जुलैमध्येच बंधारे भरल्याने प्रशासनाने ८५ टक्के जलसाठा ठेवून अतिरिक्त पाणी सोडल्याचे जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस.आर. मुळे यांनी सांगितले.
औराद येथील हवामान केंद्रावर जूनमध्ये १५३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ५ जुलै रोजी ५.४, ६ रोजी ३४.६, ७ रोजी १.४, ८ रोजी ७.०, ९ रोजी २४.६, १० रोजी ५१ मिमी असा एकूण १२४ मिमी पाऊस झाला असल्याची माहिती येथील हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
खरिपाच्या पेरण्या पूर्ण...
औराद कृषी मंडळातील पेरणी पूर्ण झाली आहे. काही भागात पेरणी लवकर झाली तर काही महसूल मंडळात जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण झाल्याचे मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील म्हणाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
डागडुजी केलेला पूल वाहून गेला...
औराद- तगरखेडा रस्त्यावरील तगरखेडा येथील ओढ्यावरील पूल पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. गतवर्षीही हा पूल वाहून गेला हाेता. या पुलास पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली हाेती. पुलाची तात्पुरती डागडुजी प्रशासनाने केली हाेती. दरम्यान, या पुलाचे काम हे पंतप्रधान ग्रामीण सडक याेजनेतून मंजूर झाले आहे. तगरखेडा- सावरी रस्त्यावरील ओढ्यावरील पूल बांधकामासाठी ५८ लाख मंजूर झाल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंखे म्हणाले. दरम्यान, या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक इतर मार्गाने होत आहे. त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.