अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे रेशन बंद करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:20+5:302021-07-05T04:14:20+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर आशिव गाव असून लोकसंख्या जवळपास ८ ते ९ हजार आहे. गावात काही वर्षांपासून मोठ्या ...

अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे रेशन बंद करण्याचा ठराव
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर आशिव गाव असून लोकसंख्या जवळपास ८ ते ९ हजार आहे. गावात काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे गावातील तरुण मद्याच्या आहारी गेले आहेत. परिणामी, गावात तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात गावात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. या घटना अवैध दारू विक्रीमुळे झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांची दारू जप्त केली होती आणि गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ग्रामपंचायतीने वारंवार विनंती करून प्रशासनास निवेदने दिली होती. परंतु, अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने २९ जूनच्या मासिक बैठकीत उपसरपंच रमाकांत वळके यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रेशनबंदीचा ठराव मांडला. तो सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी तो पाठविण्यात आला आहे.