रेणापूर तालुक्याला २६ हजार क्विंटल बियाण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:15+5:302021-06-05T04:15:15+5:30
रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात ...

रेणापूर तालुक्याला २६ हजार क्विंटल बियाण्याची गरज
रेणापूर : खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. यंदाच्या हंगामात रेणापूर तालुक्यात जवळपास ४३ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित असून, त्यासाठी २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
रेणापूर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार ३२ हेक्टर असून, त्यापैकी यंदा ४३ हजार २७५ हेक्टरवर पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यात सर्वधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४० हजार ५०० हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. ज्वारी ७००, भात १०, बाजरी २०, मका ४५०, तूर १ हजार २५०, उडीद ५०, तीळ ५०, भुईमुगाची १० हेक्टरवर पेरणी होईल. कापसाची ७५ हेक्टरवर लागवड होईल.
तालुक्याला सोयाबीन बियाणे २६ हजार ३२५ क्विंटल, ज्वारी ५३, भात ६, बाजरी १, मका ६८, तूर १५०, मूग १८, उडीद ६, तीळ १, भुईमुगाच्या १० क्विंटल बियाण्याची तर २ क्विंटल कापूस बियाण्याची आवश्यकता आहे. एकूण २६ हजार ६४० क्विंटल बियाण्याची गरज आहे.
दरम्यान, ‘महाबीज’कडे सोयाबीन, तूर, बाजरी, मका, मूग, उडीद आणि कापसासाठी ५ हजार ४०८ क्विंटल, खासगी कंपन्यांकडे ४ हजार ८२ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडे १७ हजार २७६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
बियाण्याची अडचण नाही...
तालुक्यात यंदा जवळपास ४३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाचा पेरा होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर करावा. त्यासाठी उगवण क्षमता तपासावी आणि बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले आहे.