लातूर : कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच प्रकारच्या कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान, काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम पार पडले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे, तर मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात काही ठिकाणी जावळ, विवाह संस्कार व अंत्यविधी ऑनलाईन पद्धतीने पार पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. परिणामी, अनेक मृतांचे अंत्यसंस्कार पुरोहित न मिळाल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. शहरातील राहण्याच्या प्रश्नामुळे अनेक वास्तुशांती विधी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहेत. विवाह समारंभामध्ये उपस्थितीच्या बंधनामुळे धार्मिक विधीही कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पार पडले. दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल नागरिक सजग झाले आहेत. पुरोहित मंडळींनीही प्रत्यक्ष पूजेस न जाता सोशल मीडिया व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रपठण, होम हवन केल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. अनेक ठिकाणी प्रवासाची अडचण असल्यामुळे अनेकांनी ऑनलाईन पद्धतीनेच जावळ, होम हवन, धार्मिक जप, वास्तुशांती, विवाह, नक्षत्र शांती असे काही विधी ऑनलाईन करण्यात आले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊनच विधी पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे नियमांचे काटेकोर पालन...
विवाह, वास्तुशांती या सोहळ्यात आहेरासोबत टोपीबरोबरच मास्क व सॅनिटायझरचा वापर झाला. त्यामुळे कोरोनाविषयी जनजागृती झाल्याचे दिसून आले. पुरोहितांनीही यजमानांनी मास्क घातल्यानंतरच मंत्र पठणाने पूजनाला सुरुवात केल्याचे दिसून आले.
धार्मिक विधी ऑनलाईन पद्धतीने...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महामृत्युंजय मंत्र, होम हवन, शांती कर्म, नक्षत्र शांती यासारखे विधी यजमानांच्या सूचनेनुसार केले. तसेच बाहेरील जिल्ह्यातील तसेच गावातील पूजाही ऑनलाईन पद्धतीने केल्या आहेत. - पुरोहित पंडित धनंजय धारूरकर
वेळेप्रमाणे धार्मिक व रूढी परंपरा या पद्धतीमध्ये बदल होत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व संसर्ग रोखण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये मास्क व सॅनिटायझर यांचा समावेश केला असून, यजमानांनी मास्क घातल्याशिवाय पूजा आरंभ केली जात नाही. सोळा संस्कारांतील अर्धेअधिक संस्कार ऑनलाईन पद्धतीनेच केले गेले. - पुरोहित रविकांत स्वामी तोंडारकर
अनलॉकमुळे प्रत्यक्ष उपस्थितीत धार्मिक विधी...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे आता सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊनच धार्मिक विधी पार पाडले जात आहेत. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. यजमानांनाही मास्क, सॅनिटायझर वापराबाबत सूचित करण्यात येत आहे.
पूजेला आले तरी मास्क...
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. प्रशासनाने समारंभासाठी उपस्थितीची मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.