मंजुरीनंतरही खरोसा जलयोजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:08+5:302021-07-14T04:23:08+5:30
खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ९ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने २००६ मध्ये ११ कोटी ...

मंजुरीनंतरही खरोसा जलयोजनेच्या पुनरुज्जीवनाचे काम रखडले!
खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ९ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने २००६ मध्ये ११ कोटी खर्चून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ६ खेडी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली; परंतु विविध कारणांनी ती बंद पडली. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली, तसेच एमजीपीने ६० लाखांची थकबाकी भरली; मात्र ९ गावांचा पाणी प्रश्न कायम राहिला आहे.
औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट २००६ मध्ये साडेअकरा कोटी खर्च करून ६ खेडी पाणीयोजना कार्यान्वित केली. ही योजना निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पावरून राबविली जाते. या योजनेंतर्गत खरोसा, शेडोळ, किनीनवरे, तांबरवाडी, चलबुर्गा, जावळी या गावांसह आनंदवाडी, जाऊ आणि मोगरगा या गावांचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गतची ही जलयोजना सुरुवातीस सहा गावांसाठी होती. दरम्यान, आणखीन तीन गावांचा समावेश करण्यात आला. काही काळ ही योजना सुरळीत होती; परंतु सन २०१० पासून पाणी तसेच थकीत वीज बिलामुळे योजनेस घरघर लागली.
दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत खरोसा सहा खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शासनाकडे दाखल केला होता. या प्रस्तावावर राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये निर्णय घेऊन त्यासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकीत वीज बिलाची निम्मी रक्कम म्हणजे ६० लाख ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भरली. निम्मी थकबाकी भरूनही सहा महिन्यांचा काळ उलटला तरीही नऊ गावांचा पाणी प्रश्न सुटला नाही.
प्रकल्पात जलसाठा असून, नागरिक तहानलेले...
ही जलयोजना मसलगा मध्यम प्रकल्पावरून राबवली जाते. प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असतानाही उन्हाळ्यात योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली आहे. आता पावसाळ्यातही तशीच स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
४.२५ दलघमी उपयुक्त पाणी...
या मध्यम प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ५.३३ दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा ४.२५ दलघमी आहे. पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना समस्येस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास अद्यापही कायम आहे.
वीज जोडणीअभावी कामे रेंगाळली...
मसलगा प्रकल्पावरील, खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ आणि जलवाहिनीची किरकोळ कामे झाली आहेत. वीज जोडणीअभावी काही कामे रेंगाळली आहेत. लवकरच ती पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.