कोविड लसीकरणासाठी आता महसूलच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:24+5:302021-02-05T06:25:24+5:30
लातूर : पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. ...

कोविड लसीकरणासाठी आता महसूलच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी
लातूर : पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणाला १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ६ हजार ५०० च्या वर लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, कोरोना कामातील महसूलच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी आता सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या नोंदणी पोर्टलवर आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील ४७० महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंद झाली आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १७ हजार ८२४ जणांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार ५०० च्या पुढे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. १३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्राला दरदिवसाला १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली आहे. दररोज प्रमाण वाढत आहे.
महसूलच्या ४७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंद
आतापर्यंत ४७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. लातूर तहसील ५०, उदगीर ९९, अहमदपूर ७९, रेणापूर ३८, चाकूर ८५, जळकोट तहसील कार्यालयातील ४४, एसटी व कार्यालय अहमदपूर ६, जिल्हाधिकारी कार्यालय १२, पुरवठा विभागातील २७, नियोजन विभागातील १३, संजय गांधी योजना शाखेतील १, अशा एकूण ४७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची लस देण्यासाठी पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यांची अद्ययावत माहिती या पोर्टलमध्ये भरण्यात आली आहे.