दररोज ४ लाख ८० हजार लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:31+5:302021-08-17T04:25:31+5:30

लातूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सांडपाण्यावर विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया करणारा ...

Recycling on 4 lakh 80 thousand liters of water per day | दररोज ४ लाख ८० हजार लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया

दररोज ४ लाख ८० हजार लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया

लातूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सांडपाण्यावर विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया करणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी विविध पर्यायांवर पालिकेच्यावतीने काम केले जात आहे. केवळ पाणीटंचाईच नाही तर शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठीही मनपा विविध उपक्रम राबवते. नाल्यातील पाण्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळणे आणि पाण्याचा पुन्हा वापर करणे या हेतूने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. शहराच्या विविध भागातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर महानगरपालिकेने विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यात नाल्याचे पाणी अडवून या दूषित पाण्यावर वेगवेगळ्या माध्यमातून जैविक प्रक्रिया केली जाते. एका प्रकल्पातून प्रतिदिवशी ६० हजार लीटर शुद्ध पाण्याची होते. अशा एकूण ८ प्रकल्पांमुळे ४ लाख ८० हजार लीटर शुद्ध पाणी पुन्हा वापरात येणार आहे. पाणी शुद्धीकरण करताना निघालेल्या वेस्टेजचा खत म्हणून वापर करणे शक्य होणार आहे. एकूण ८ प्रकल्पांपैकी मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरातील प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, नगरसेवक रविशंकर जाधव, अशोक गोविंदपूरकर, आयुब मनियार, अहमद खान पठाण, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी अमित देशमुख म्हणाले, पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रकल्प लातुरात उभा राहिला याचे समाधान वाटते. सर्वच शहरांमध्ये अशा प्रकल्पांची आवश्यकता आहे. यामुळे प्रदूषणमुक्तीसह पाणीटंचाई कमी करण्यासही मदत होणार आहे. मनपाने उभारलेला हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

२५ लाखांत उभारला प्रकल्प...

अनेक शहरात मलनिःसारण अथवा सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारले जातात. परंतु, त्यावर येणारा भरमसाठ खर्च आणि त्याची देखभाल, दुरुस्ती करणे शक्य होत नाही. लातूर मनपाने केवळ २५ लाखांमध्ये एका प्रकल्पाची उभारणी केली आहे. एकूण ८ प्रकल्पांकरिता २ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

Web Title: Recycling on 4 lakh 80 thousand liters of water per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.