हाळी हंडरगुळी परिसरात गुऱ्हाळे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:54+5:302020-12-08T04:16:54+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील साखर कारखान्याचे धुरांडे पेटले असले तरी हाळी हंडरगुळी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल गुऱ्हाळाकडे आहे. ...

हाळी हंडरगुळी परिसरात गुऱ्हाळे सुरु
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील साखर कारखान्याचे धुरांडे पेटले असले तरी हाळी हंडरगुळी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल गुऱ्हाळाकडे आहे. परिसरात जवळपास १५ ते २० ठिकाणी गुऱ्हाळे सुरू असल्याने दररोज लाख रुपयांचा गुळ उत्पादित केला जात आहे.
हाळी हंडरगुळी परिसरात तिरु प्रकल्प असल्याने या परिसरातील हाळी, हंडरगुळी, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, सुकणी, आडोळवाडी, वडगाव, कुमठा, शिवणखेड, वायगाव, आनंदवाडी या शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु असल्याने तालुक्यातील विलास शेतकरी साखर कारखाना युनिट- २ व शेजारील तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गाळपास सुरुवात झाली आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी धावपळ करीत आहेत. काही शेतकऱ्यांची मानसिकता गुऱ्हाळाकडे वळली आहे. कारखाने ६७१, ८६०३२ या जातीच्या उसाला प्राधान्य देत असल्याने इतर जातीच्या उसाचे गाळप केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.
विजेच्या सततच्या भारनियमनामुळे व कमी दाबाच्या वीज प्रवाहामुळे गुऱ्हाळाचा चरखा चालत नसल्याने बहुतांश ठिकाणी इंजिनच्या वापर सुरु आहे. त्याचा गुळ उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. मजुरांची वाढलेली टंचाई, खत व औषधांच्या वाढलेल्या किंमती व उत्पादनाचे गणित जुळत नसल्याने गुऱ्हाळे चालवणे अवघड झाल्याचे दयानंद गुद्दे या शेतकऱ्याने सांगितले.
एका नांदीत २२ डाग...
दीड टन ऊस गाळप केल्यानंतर एका नांदीत २२ ते २४ गुळाचे डाग निघतात. एका नांदीचे गुळ उत्पादन करण्यासाठी १४०० रुपये मजुरी, ३०० रुपये चरखा भाडे, ३०० रुपये गुळव्या, १०० रुपये औषध, २०० रुपये डिझेल असे सरासरी २३०० रुपये खर्च करावा लागतो.
- उपेंद्र काळेगोरे, ऊस उत्पादक, हाळी.
***