उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त
By हरी मोकाशे | Updated: September 10, 2022 15:58 IST2022-09-10T15:57:32+5:302022-09-10T15:58:06+5:30
नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता जुगार

उदगीरात जुगार अड्ड्यावर धाड; ११ लाखांचा ऐवज जप्त
उदगीर (जि. लातूर) : शहरातील नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तिर्रट नावाच्या पत्त्याच्या जुगार अड्डयावर सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून रोख रकमेसह ११ लाखांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींत देवणी ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, बुधवारी रात्री उशिरा नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरुन सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात रोख १ लाख ८२ हजार ३४० रुपये व ९ लाख २१ हजारांच्या किमतीचे मोबाईल, वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण ११ लाख ३ हजार ३४० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी राम बनसोडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी दिली.