खरिपातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:38+5:302021-08-15T04:22:38+5:30
लातूर : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साेयाबीनचा माेठ्या प्रमाणावर पेरा झाला आहे. अशास्थितीत जवळपास एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. ...

खरिपातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करा
लातूर : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात साेयाबीनचा माेठ्या प्रमाणावर पेरा झाला आहे. अशास्थितीत जवळपास एक महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे साेयाबीनसह इतर पिकांनी सध्या माना टाकल्या आहेत. पावसाअभावी साेयाबीनचे पीक जाग्यावरच वाळत आहे. अद्यापही महसूल आणि कृषी विभागाने या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील साेयाबीनचे पीक सध्या धाेक्यात आले आहे. कृषी विभाग, महसूल विभाग आणि संबंधित पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाहीत. विमा कंपन्यांनी लादलेले निकष शेतकऱ्यांना समजत नाहीत. जाचक अटी आणि निकषांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या नुकसानाबाबत दाद मागता येत नाही. शेतकऱ्यांकडे अगलचा कॅमेरा असलेले माेबाईल उपलब्ध नाहीत. जर अगलचा कॅमेरा घेऊन शेतकरी शेतात गेले तर विमा कंपनीची लिंक ओपन हाेत नाही. आता दाद काेणाकडे मागायची, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील सर्वच पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, बाजार समितीचे संचालक तथा भिसे वाघाेलीचे उपसरपंच संभाजी वायाळ, नबी सय्यद, विजयकुमार वायाळ, रामेश्वर वायाळ, नानासाहेब भिसे, व्यंकट निलंगे, सुधाकर वायाळ, फारुख सय्यद, लिंबराज पानखडे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.