आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा
By संदीप शिंदे | Updated: December 27, 2024 17:03 IST2024-12-27T17:02:47+5:302024-12-27T17:03:34+5:30
हजारो समाजबांधवांचा सहभाग; आरोपींना अटक करण्याची मागणी

आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा
रेणापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच घटनेतील सुत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दीड वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या घटनेची नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे व आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, खुनप्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्या हस्ते तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळफाटा येथे चक्काजाम आंदोलन...
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एकूण चार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी रोजी रेणापूर-पिंपळ फाटा येथे चक्काजाम आंदोलन होणार आहे. शुक्रवारी मोर्चेकऱ्यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.
न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा...
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, मी रेणापूर तालुक्यातील वाला येथील नात आहे. आमच्या कुटुंबाच्या न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा. आमच्या कुटुंबावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. माझ्या वडिलांनी कुटूंबापेक्षा समाजाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरवही झाला. शासनाने आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.