उदगिरातही सीसीटीव्ही बसविणार...
लातूरपाठाेपाठ माेठे शहर असलेल्या उदगीर शहरातील वाहतूक यंत्रणा सुरळीत करण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील चाैका-चाैकात सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाचीही मदत घेतली जाणार आहे. जिल्हा नियाेजन समितीच्या माध्यमातून लातूर आणि उदगीरसाठी काही निधी मिळेल का, याबाबत प्रस्ताव दाखल केले जातील. या विषयांवर चर्चा झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
चाैक्यांची हाेणार सुधारणा...
लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या पाेलीस चाैक्यांची सुधारणा करण्याचा मानस आहे. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यानंतर येथे प्राधान्यांने पिण्याचे पाणी, शाैचालय उभारले जाणार आहे. शिवाय, या चाैक्या थेट नियंत्रण कक्षाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर पाेलीस प्रशासनाच्या सुधारणेसाठी केला जाणार असल्याचे पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.