बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्राचार्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST2021-05-05T04:31:55+5:302021-05-05T04:31:55+5:30
चापोली : यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. त्यामुळे तत्पूर्वी महाविद्यालयांना वाटप ...

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्राचार्यांवर
चापोली : यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. त्यामुळे तत्पूर्वी महाविद्यालयांना वाटप केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सीलबंद उत्तरपत्रिका महिनाभर कस्टडीत सांभाळून ठेवण्याची संवेदनशील जबाबदारी महाविद्यालयावर येऊन पडली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांचा ताण अधिकच वाढला आहे.
इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा यंदा २३ व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. परंतु, बारावीच्या परीक्षा कधी होतील, हे अद्याप जाहीर झाले नाही. अगोदर एप्रिलमध्ये परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप केले होते. लातूर विभागीय मंडळानेही महाविद्यालयापर्यंत साहित्य पोहोचविले आणि परीक्षेची तारीख लांबल्याची घोषणा झाली. आता या साहित्याचे काय करावे, असा प्रश्न महाविद्यालयासमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे यंदा परीक्षा केंद्राची संख्या वाढली आहे. कोरोनाची स्थिती पाहून बारावी परीक्षांचे नियोजन होणार आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात, तिथेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
हे साहित्य कस्टडीत...
कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी ग्राफ, मॅप, होलोक्रॉस्ट, स्टिकर, सीटिंग प्लॅन, ए.बी. लिस्ट, विषय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका आदी परीक्षेचे साहित्य आहे. हे साहित्य केंद्र संचालकांनी स्वतः कस्टडीत जपून ठेवावे. संबंधित शाळांना वाटप करू नये, असे आदेश लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला...
कोरोनामुळे शाळा झाली असले अथवा नाही, परंतु, १२ वीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी जमेल तशी परीक्षेची तयारी केली आहे. त्यात शाळांनीही विविध उपक्रमांतून तयारी करून घेतली. परंतु, आता परीक्षेची तारीख लांबली. त्यामुळे परीक्षा कधी घेतली जाणार, अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
कोरोनामुळे मोठे संकट...
कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र सध्याची कोरोनाची गंभीर स्थिती पाहता मोठे संकट आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आता परीक्षा कधी होणार हे निश्चित सांगता येत नाही, असे येथील संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे म्हणाले.
ऑफलाइन परीक्षेचे संकेत...
परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाने बारावी परीक्षेची तारीख जाहीर करताच परीक्षांचे नियोजन केले जाईल. ऑफलाइन परीक्षा होतील, असे संकेत आहेत. मात्र, परीक्षा कधी होणार, हे शासनाने स्पष्ट केले नाही, असे येथील संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजेंद्र कुलकर्णी म्हणाले.