लातुरात भाजीपाल्यांचा भाव घसरला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:12+5:302020-12-07T04:14:12+5:30
सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर ! लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. ...

लातुरात भाजीपाल्यांचा भाव घसरला;
सध्या किराणा मालाचे दर मात्र स्थिर !
लातूर : शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने भाजीपाल्यांचे दर घसरले. सध्या भाजीपाला कवडीमोल किंमतीत विक्री केला जात आहे. तर किराणा मालाचे दर दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत. ३० रुपयांना मिळणारी मेथीची पेंढी आता ३ रुपयांवर आली आहे. १० रुपयांत तीन ते चार पेंढ्या दिल्या जात आहेत.
दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलासह हरभरा डाळीचे भाव वधारले होते. आता दिवाळीनंतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. सध्या साखर ३५ रुपये किलो दराने विकली जात आहे. खाद्य तेल १२० रुपये, पामतेल १०५ रुपये, खोबरं १६० रुपये, हरभरा डाळ प्रति किलो ७५ ते ८० रुपये, तूर डाळ १०५, मसूर डाळ ९० रुपये, मूगदाळ आणि उडीद डाळीचा प्रति किलो ११५ रुपयांचा भाव आहे. दिवाळीच्या दरम्यान लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्यांचे प्रति किलोचे भाव शंभरीच्या घरात होते. आता ते २० रुपयांच्या घरात आले आहेत. तब्बल ७० ते ८० टक्के भाव घसरले आहेत. १२० रुपये किलोने मिळणारी फुलकोबी सध्या १० ते १५ रुपये किलो मिळत आहे. पत्ताकोबी २५, वांगी २५, बटाटे ४०, भेंडी ३०, गवार ५०, दोडका ३०, टोमॅटो ३०, गाजर ४०, भोपळा २०, पालक १०, कांदापात ८, हिरवी मिरची ३० रुपये, कोथिंबीर १०, चुका ७०, वरणा ४० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.
ऐन दिवाळीत कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात भाव गेला होता. आता कांद्याचे भावही टप्प्या-टप्प्याने घसरू लागले आहेत. प्रति किलो ३५ ते ५० रुपये दराने कांदा मिळत आहे. सर्वाधिक भाव चुक्याचा आहे. प्रति किलो ७० रुपयाने नागरिकांना चुका विकत घ्यावा लागत आहे.
लातूर येथील फळबाजारात चिकू, मोसंबी, केळी आणि सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सफरचंद प्रति किलो सध्या ८० ते १०० रुपये दराने मिळत आहे. चिकू ५० रुपये किलो दराने तर मोसंबी ५० ते ६० रुपये आणि केळी ४० रुपये डझनाने मिळत आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्य तेलाबरोबर डाळींचे भाव वाढले होते. आता ते भाव स्थिर झाले आहेत. साखरेचा भाव मात्र दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही ३५ रुपयेच आहे. त्यापाठोपाठ खाद्य तेल प्रति किलो १२० रुपये आहे. किराणाचे दर स्थिर आहेत.
-निलेश हलगरकर,
हिवाळ्याच्या हंगामात फळांना मोठी मागणी असते. रानमेवा असलेल्या सीताफळासह सफरचंद, चिकू, संत्रा, केळी आणि इतर फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या चिकू आणि सफरचंदाची मागणी मोठी आहे. त्यांचे भावही शंभराच्या आत आहेत.
- बाबा शेख,
लातूरसह जिल्हाभरातील बाजारात भाजीपाला कवडीमोल झाला आहे. प्रति किलो १० ते २० रुपयांच्या घरात विकला जात आहे. यातून भाजी विक्रेत्यांचा रोजगारही निघत नसल्याचे चित्र आहे. मेथी, कोथिंबीर आणि इतर भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.
- भीमा शिंदे,