वनक्षेत्र वाढीसाठी तालुकानिहाय मास्टर प्लान तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:38+5:302021-06-26T04:15:38+5:30

लातूर : राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ ...

Prepare taluka wise master plan for forest growth | वनक्षेत्र वाढीसाठी तालुकानिहाय मास्टर प्लान तयार करा

वनक्षेत्र वाढीसाठी तालुकानिहाय मास्टर प्लान तयार करा

लातूर : राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा अधिक काम करून ग्रीन लातूर जिल्हा निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय वृक्ष लागवडीचा मास्टर प्लान तयार करावा व त्यानुसार वृक्ष लागवड करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड मोहीम आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त अमान मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, विभागीय वन अधिकारी गायकर, सामाजिक वनीकरण विभागाचे सुनील शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्याकडील जमिनीवर बांबू लागवडीचे किमान २ हेक्टर क्षेत्रावर डेमो प्लांट तयार करावेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे. सध्या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत जिल्ह्यात फक्त ६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कृषी विभाग व वन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट व रेणापूर या छोट्या तालुक्यांना ५०० एकर बांबू लागवडीचे उद्दिष्ट द्यावे तर उर्वरित तालुक्यांना किमान एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात यावे, असेही पालकमंत्री म्हणाले.

भूकंपग्रस्त गावात वृक्ष लागवड करावी...

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावात गावठाण भागात वृक्ष लागवड करून तो भाग वनाच्छादित करण्यासाठी आराखडा सादर करावा. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व वृक्षांनी नटलेले व इतरांसाठी आदर्श असणारे असे गाव निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत. यासाठी पथदर्शक प्रकल्प म्हणून बाभळगावपासून सुरुवात करावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.

Web Title: Prepare taluka wise master plan for forest growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.