ॲडमिशन प्रक्रिया संपताच परीक्षांची तयारी; फार्मसी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:36+5:302021-02-16T04:20:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोना व लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच शैक्षणिक घटकांची प्रवेश प्रक्रिया उशिरा निघाली. मात्र, शासनाने शैक्षणिक ...

Preparation for examinations as soon as the admission process is over; Pharmacy, Polytechnic students in confusion | ॲडमिशन प्रक्रिया संपताच परीक्षांची तयारी; फार्मसी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी संभ्रमात

ॲडमिशन प्रक्रिया संपताच परीक्षांची तयारी; फार्मसी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोना व लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच शैक्षणिक घटकांची प्रवेश प्रक्रिया उशिरा निघाली. मात्र, शासनाने शैक्षणिक सत्रात कोणताही बदल केलेला नाही. परिणामी, शिक्षण उशिरा सुरू झाले असले तरी परीक्षा मात्र वेळेवरच होणार असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर महाविद्यालयांचा भर आहे. विशेषत: पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संभ्रमावस्था आहे.

जिल्ह्यात पॉलिटेक्निकची १२, तर बी. फार्मसीची दहा महाविद्यालये आहेत. या दोन्ही विभागांमध्ये जवळपास साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षामध्ये प्रवेश झाले आहेत. पॉलिटेक्निकची महाविद्यालये सुरू झाली असून, अभ्यासक्रमही पूर्ण केला जात आहे. मात्र, बी. फार्मसीचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकाशी निगडीत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना कसरत करावी लागणार आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वच शैक्षणिक विभागाच्या प्रवेश प्रक्रिया उशिराने झाल्या. त्यामुळे जुलै ते ऑगस्टदरम्यान सुरू होणारी फार्मसी, पॉलिटेक्निकची महाविद्यालये जानेवारीमध्ये सुरू करण्यात आली. ॲन्युअल पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण येणार नसली तरी सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यासावर भर द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात पॉलिटेक्निक, फार्मसी कॉलेजची स्थिती

पॉलिटेक्निक कॉलेज १२

प्रवेश घेतलेले विद्यार्थी २८००

बी. फार्मसी कॉलेज १०

प्रवेश घेतलेले विद्यार्थी ८००

काय म्हणतात विद्यार्थी...

आत्ताच ॲडमिशन झाले आहे. कॉलेजमध्ये शिकवणीही सुरू झालेल्या आहेत. लगेच परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षा उशिराने घ्यावी. - प्रशांत झुंजारे, फार्मसी विद्यार्थी

आमचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर अवलंबून आहे. लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद होते. त्यामुळे प्रात्यक्षिक पूर्ण करता आले नाही. परीक्षांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरच परीक्षा घ्याव्यात. -फिरदोस सय्यद, फार्मसी विद्यार्थिनी

आमचे पॉलिटेक्निकचे वर्ग नियमित सुरू आहेत. अभ्यासक्रम नियमित असल्याने परीक्षेेचे अर्ज भरले आहेत. अभ्यासात सातत्य ठेवल्यास परीक्षेपर्यंत तयारी पूर्ण होईल. कोरोनामुळे उशीर झाला असला तरी परीक्षेला सामोरे जाण्यास तयार आहे. - माधव घाडगे, पॉलिटेक्निक विद्यार्थी

कॉलेज आणि स्वत: प्रयत्न केले तर अभ्यासक्रम लवकरच पूर्ण होईल. लॉकडाऊनमध्येही ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात झाली होती. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाला गती मिळाली आहे. परीक्षेचा अर्ज भरला आहे. - संतोष औसेकर, पॉलिटेक्निक विद्यार्थी.

तंत्रशिक्षण बोर्डाच्या वतीने वार्षिक वेळापत्रक दरवर्षी जाहीर केले जाते. त्यानुसार कॉलेज आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत असतात. त्याअनुषंगाने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेआधी पूर्ण करण्याचा मानस आहे. - प्राचार्य के. एम. बकवाड, पूरणमल, लाहोटी तंत्रनिकेतन

औषधी निर्माणशास्त्र शाखेमध्ये प्रात्यक्षिकावर अधिक भर असतो. कोरोनामुळे कॉलेज काही दिवस बंद होते. आता नियमित वर्ग सुरू झाले असून, प्रात्यक्षिक आणि थिअरीवर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा घेणे सोयीचे ठरणार आहे. - प्राचार्य संजय थोंटे, चन्नबसवेश्वर फार्मसी, लातूर.

Web Title: Preparation for examinations as soon as the admission process is over; Pharmacy, Polytechnic students in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.