खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:01+5:302021-05-23T04:19:01+5:30
लातूर : गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानाचा अंदाज नेहमीच अप्रत्याशित राहत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ...

खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी
लातूर : गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमानाचा अंदाज नेहमीच अप्रत्याशित राहत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली होती. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अथवा अशी वेळ येऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयारी करत असताना जिल्ह्यातील सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, केटी वेअर्स, स्टोरेज टॅंक व इतर प्रकल्पांची व पुलांची तपासणी करून खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून २०२१ पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयारी करत असताना यंदा या आपत्ती व्यवस्थापनाला कोविड संसर्गाची पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने गाव ते जिल्हा मुख्यालय स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करुन अधिक सतर्कतेने सज्ज राहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व जुन्या, नव्या पुलांची तपासणी करुन घ्यावी. पाटबंधारे विभागाने सर्व लहान-मोठ्या प्रकल्पांच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी करुन फोटोसह अहवाल सादर करावा. पूर व्यवस्थापनासाठी नदीकाठावरील तसेच पूरप्रवण गावांमध्ये संपर्क यंत्रणा व खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा. पावसाळ्यात सर्व शासकीय यंत्रणांची संपर्क यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. त्यावरुन वेळचेवेळी संदेश व आवश्यक माहितीची देवाण-घेवाण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दुरुस्ती परीक्षणाचा सविस्तर आढावा...
लातूर जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यावरील पुलांचे व पाटबंधारे विभागाचे प्रकल्प, केटी वेअर, पाझर तलाव दुरुस्तीबाबतच्या लेखा परीक्षणाचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक तालुकास्तरावर असणाऱ्या नियंत्रण कक्षाचे येत्या १ जूनपासून आठवड्यातून सात दिवस कार्यान्वित असणे आवश्यक आहे. याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.