बेशिस्त पार्किंग, अवैध दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:50+5:302021-08-20T04:24:50+5:30
निटूर : निलंगा तालुक्यातील निटूर - लातूर राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त पार्किंग करून वाहने रस्त्यावर लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ...

बेशिस्त पार्किंग, अवैध दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
निटूर : निलंगा तालुक्यातील निटूर - लातूर राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त पार्किंग करून वाहने रस्त्यावर लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार वाहनांवर व कलांडी येथे अवैध देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी निटूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जहिराबाद-निटूर-लातूर या महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. काही ठिकाणी पुलांचे काम प्रगतीपथावर असून, सर्व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, निटूर येथे मुख्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच अन्य वाहने रस्त्यावर लावल्याने रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. काही दिवसांपूर्वी एस. टी. महामंडळाने निटूरच्या बेशिस्त वाहतुकीसंदर्भात पत्र दिले होते. ज्यामुळे एस. टी. बसला अडचण होत असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, निटूर पोलीस चौकीचे पोलीस जमादार सत्यवान कांबळे, अस्लम सय्यद, हारी कांबळवाड, शिवानंद गिरवणे यांनी निटूरच्या चार वाहनांवर कलम २८३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे निटूरमधील वाहतूक व्यवस्था दोन्ही बाजूंनी सुरळीत झाली आहे. तसेच वांजरखेडा येथे अवैध देशी दारु विक्रीवर कारवाई करत ४० बाटल्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.