समाजमन घडविणारी कविताच चिरकाल टिकते : रामचंद्र तिरुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:34+5:302021-08-27T04:23:34+5:30

येथील रघुकूल मंगल कार्यालयात अव्होपाच्या प्रबोधन साहित्य मंच तर्फे मंगळवारी सुरेखा उदय गुजलवार लिखित ‘सृजनतेचे लेणे’ व ऋषिकेश उदय ...

Poetry that shapes society lasts forever: Ramchandra Tiruke | समाजमन घडविणारी कविताच चिरकाल टिकते : रामचंद्र तिरुके

समाजमन घडविणारी कविताच चिरकाल टिकते : रामचंद्र तिरुके

येथील रघुकूल मंगल कार्यालयात अव्होपाच्या प्रबोधन साहित्य मंच तर्फे मंगळवारी सुरेखा उदय गुजलवार लिखित ‘सृजनतेचे लेणे’ व ऋषिकेश उदय गुजलवार यांच्या ‘ये रे ये रे पावसा’ या मायलेकरांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षपदावरून रामचंद्र तिरुके बोलत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील ग्रामीण कथाकार प्रा. डॉ. जगदीश कदम, प्रकाशक व लेखक दत्ता डांगे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर, समीक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण, अव्होपाचे अध्यक्ष प्रा. संजय चन्नावार, कवयित्री सुरेखा व कवी ऋषिकेश गुजलवार यांची उपस्थिती होती. यावेळी तिरुके म्हणाले, मायलेकराच्या पुस्तकाचे प्रकाशन ही साहित्य विश्वातील अनोखी घटना असून, नक्कीच उदगीरच्या सांस्कृतिक क्षेत्रात ही पुस्तके भर घालतील, असा विश्वास तिरुके यांनी व्यक्त केला.

प्रा. डॉ. कदम म्हणाले, संवेदनेच्या पातळीवर सर्वत्र दुष्काळ जाणवत असताना संवेदनेची पेरणी करणाऱ्या या कविता समाजाची मने जोडून ठेवतील. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी शालेय विद्यार्थी असलेल्या ऋषिकेशच्या ‘ये रे ये रे पावसा’ या कवितासंग्रहात बाळबोधपणा जाणवत नाही, उलट शब्दांची साठवण व मांडणी मनाला भावणारी असल्याने भविष्यात तो साहित्य विश्वात मोठे नाव करेल, असा आशावाद व्यक्त केला. समीक्षक प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी सुरेखा गुजलवार लिखित ‘सृजनतेचे लेणे’ हा कवितासंग्रह सर्वस्पर्शी असून, यातून उमटणारे प्रतिबिंब समाजहिताचे असेल, असे सांगितले. प्रास्ताविक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत आयुष गुजलवार याने स्वागत गीताने केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार व रसूल पठाण यांनी केले. आभार डॉ. उदय गुजलवार यांनी मानले.

Web Title: Poetry that shapes society lasts forever: Ramchandra Tiruke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.