महिनाभरात रस्त्यावर जागोजागी खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:10+5:302021-07-30T04:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हरंगुळ बु. : बार्शी रोड ते अतिरिक्त एमआयडीसीमार्गे हरंगुळ बु.कडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच मजबुतीकरण झाले आहे. ...

महिनाभरात रस्त्यावर जागोजागी खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
हरंगुळ बु. : बार्शी रोड ते अतिरिक्त एमआयडीसीमार्गे हरंगुळ बु.कडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच मजबुतीकरण झाले आहे. मात्र, महिनभरातच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
बार्शी रोड ते अतिरिक्त एमआयडीसीमार्गे हरंगुळ बु.कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गत महिन्यात पूर्ण झाले. दीड किलोमीटर अंतराच्या कामासाठी सव्वा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मांजऱ्या, गेरुचा वापर केला असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, डांबराचे प्रमाण कमी असल्याचे वाहनधारक सांगत आहेत. सध्या पावसाळा सुरू असून, पाऊस झाला की जागोजागी पडलेल्या खड्डयांत पाणी साचत आहे. हा रस्ता अतिरिक्त एमआयडीसीचा असल्यामुळे सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
पालकमंत्र्यांकडे तक्रार...
अतिरिक्त एमआयडीसीतील रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, गारु व मांजऱ्या खडीचा वापर झाला आहे. संबंधित अभियंता व ठेकेदाराला सांगूनही कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे हरंगुळ बु.चे सरपंच सूर्यकांत सुडे यांनी सांगितले.
दुरुस्ती करण्यात येईल...
या कामासंदर्भात गुत्तेदाराला सातत्याने सूचना करण्यात आल्या. पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते लवकरात लवकर बुजविण्यात येतील, असे अभियंता चाटे यांनी सांगितले.