ऑनलाईन कामांसाठी 'डेटा' भत्ता द्या; कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Updated: August 22, 2022 14:47 IST2022-08-22T14:46:20+5:302022-08-22T14:47:15+5:30
कृषी सहाय्यक समक्ष असलेल्या तलाठी संवर्गास शासनाकडून ऑनलाइन कामासाठी डेटा चार्ज मिळतो

ऑनलाईन कामांसाठी 'डेटा' भत्ता द्या; कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन
लातूर : ऑनलाइन कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संगणकीय कामासाठी, लॅपटॉप व शासकीय ॲप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून मासिक दीड हजार रुपये देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
हे एक दिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे विभागीय सचिव संतराम कसबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आंदोलनात राज्य कोषाध्यक्ष वसंत जारीकोटे, आनंद आवारे, जिल्हाध्यक्ष ओमकार माने, सचिव शरद धनेगावे, संतोष तिवारी, राम यादव, वैभव लेनेकर, बलभीम आवटे, आनंद जाधव, शंकर पवार यांच्यासह जवळपास 300 कृषी सहाय्यक सहभागी झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.
कृषी सहाय्यक समक्ष असलेल्या तलाठी संवर्गास शासनाकडून ऑनलाइन कामासाठी लॅपटॉप डाटा चार्जेसची रक्कम दरवर्षी नियमितपणे दिली जाते. मात्र कृषी सहाय्यकांना हा खर्च मिळत नाही असेही कृषी सहाय्यकाने सांगितले.