मनरेगातून ग्रामविकासाचा औसा पॅटर्न राज्यभर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:27+5:302020-12-13T04:34:27+5:30
आ. अभिमन्यू पवार यांनी रोजगार हमी योजनेचे सचिव नंदकुमार यांची भेट घेऊन जनावरांच्या संख्येची अट शिथिल करण्याची मागणी ११ ...

मनरेगातून ग्रामविकासाचा औसा पॅटर्न राज्यभर जाणार
आ. अभिमन्यू पवार यांनी रोजगार हमी योजनेचे सचिव नंदकुमार यांची भेट घेऊन जनावरांच्या संख्येची अट शिथिल करण्याची मागणी ११ नोव्हेंबर रोजी केली होती. दरम्यान, याला यश मिळाले असून, ९ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत अट शिथिल करण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी मंत्रीमंडळाने शरद पवार ग्रामसमृद्धी राबविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भाने आ. अभिमन्यू पवार म्हणाले, १३ ऑक्टोबर २०२० रोजी औसा येथे झालेल्या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत झालेल्या कुशल कामांचे पॅकेजिंग करत औसा पॅटर्नच्या अंमलबजावणीसाठी अनेक गावांना भेटी दिल्या. शेतकरी बांधवांशी संवाद साधला. दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी परिपत्रक काढून औसा पॅटर्नला मंजूरी दिली. यामध्ये वेगवेगळ्या १२ पॅकेजेसचा समावेश करण्यात आला. त्याच धर्तीवर शासनाने शरद पवार ग्रामसमृद्धी याेजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे औसा पॅटर्नची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. ६ जनावरे असण्याची अट शिथिल करून २ जनावरे इतकी करण्यात आल्याने शेतक-यांना लाभ होणार आहे, याचा आनंद आहे, असेही आ. पवार म्हणाले.
मनरेगा अंतर्गत विहिरींचे पुनर्भरण...
आ. अभिमन्यू पवार म्हणाले, विकासाला चालना देण्यासाठी २६२ कामांचा मनरेगा अंतर्गत राज्य अभिसरण नियोजन आराखड्यात समावेश व्हावा तसेच मनरेगा अंतर्गत विहिरीचे पुनर्भरण करता यावे, याचा पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांचे पत्र घेऊन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना भेटणार असल्याचेही आ. पवार म्हणाले.