राखी पौर्णिमेनिमित्त रेल्वेला प्रवाशांची पसंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:26+5:302021-08-21T04:24:26+5:30
उदगीर : राखी पौर्णिमेनिमित्त करण्यात येणाऱ्या प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वेला पसंती दिली आहे. आरक्षणाशिवाय प्रवास नाही या निर्णयामुळे आरक्षणासाठी गर्दी ...

राखी पौर्णिमेनिमित्त रेल्वेला प्रवाशांची पसंती !
उदगीर : राखी पौर्णिमेनिमित्त करण्यात येणाऱ्या प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वेला पसंती दिली आहे. आरक्षणाशिवाय प्रवास नाही या निर्णयामुळे आरक्षणासाठी गर्दी होत आहे. उदगीर रेल्वेस्थानकसोबतच खासगी रेल्वे आरक्षण केंद्रांवर आणि मोबाइलवरील आयआरसीटीसी ॲपद्वारे करण्यात येणाऱ्या बुकिंगमुळे रेल्वेची आरक्षण संख्या दुप्पट झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत झाली आहे. प्रवाशांनी परवडणाऱ्या प्रवास दरात आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेला पसंती दिली आहे. खासगी ट्रॅव्हल्स आणि बसच्या वाढत्या दरामुळे प्रवासी परवडणाऱ्या रेल्वे प्रवासाकडे वळत आहेत. यामुळे उदगीर स्थानकावरून पुणे, औरंगाबाद व हैदराबाद या तीन मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना गर्दी होत आहे.
स्थानकावरून धावतात या गाड्या...
उदगीर रेल्वेस्थानकातून बिदर-मुंबई, नांदेड-बंगळुरू, सिकंदराबाद-शिर्डी, पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, औरंगाबाद-रेनिगुंटा, लातूर-यशवंतपूर आणि हैदराबाद-हडपसर या गाड्या धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रवाशांची ऐन सणासुदीत सोय...
कोरोनामुळे काही दिवस रेल्वेसेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांची सोय झाली आहे.
सर्व धावणाऱ्या गाड्या विशेष गाडी नावाखाली चालवल्या जात असल्यामुळे भाडे दुपटीने तथा त्यापेक्षाही वाढले आहे. सदरील नियमित गाड्या चालू केल्यास अवास्तव भाडे कमी होतील अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.