मोफत शाळा प्रवेशाकडे पालकांची पाठ; आरटीईच्या ५० टक्के जागा रिक्तच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:38+5:302021-07-12T04:13:38+5:30
लातूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाकडे एकूण अर्जांच्या संख्येपैकी ५० टक्के पालकांनी ...

मोफत शाळा प्रवेशाकडे पालकांची पाठ; आरटीईच्या ५० टक्के जागा रिक्तच !
लातूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाकडे एकूण अर्जांच्या संख्येपैकी ५० टक्के पालकांनी पाठ फिरवली आहे. या योजनेंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील एकूण १० तालुक्यांत ३,९८९ पालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. १,७४० रिक्त जागांपैकी १,६०४ जागांसाठी निवड झाली आहे. मात्र, ७८१ पालकांनी अद्यापही या मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.
शाळांचे पैसे सरकार कधी देणार?
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे शुल्क २०२०पासून सरकारकडे थकले आहे. त्यामुळे शाळांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने शाळा आणि शिक्षणाबरोबर आर्थिक नियोजन करणे कठीण झाले आहे. - अमित शेवाळे
पालकांच्या अडचणी काय?
आरटीई अंतर्गत काही पालकांनी महत्त्वाच्या शाळांचीच नावे दिली होती. एकाच शाळेत अनेकांना प्रवेश हवा असल्याने विद्यार्थी प्रवेश संख्येची मर्यादा आली. शिवाय, अर्जातील त्रुटींमुळे अनेकांची निवड झाली नाही. - विष्णू किनीकर, पालक
आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला, मात्र जवळची शाळा न मिळाल्याने प्रवेश घेता आला नाही. शिवाय, ज्या शाळेत प्रवेश पाहिजे होता तिही शाळा मिळाली नाही. त्यासाठी जवळच्याच शाळेत प्रवेश दिला आहे. - साहेबराव निकाळजे, पालक
५० टक्के पालकांचा प्रतिसाद
लातूर जिल्ह्यातील एकूण २३८ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १,७४० जागांपैकी १,६०४ जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड झाली. अशांना आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या ८२३ जणांनीच प्रवेश घेतला आहे.
- विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी
दुसऱ्यांदा मुदतवाढ
आरटीई प्रवेशांतर्गत निवड करण्यात आलेल्या अनेक पालकांनी आपल्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
एकूण जागा १७४०
आतापर्यंत झालेले प्रवेश ८२३
शिल्लक जागा ७८१