ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:51+5:302021-04-19T04:17:51+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असून, दिवसागणिक दीड हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविरचाही ...

ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर !
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असून, दिवसागणिक दीड हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविरचाही तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १५ हजार ३७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणाचे असून, गृह विलगीकरणात सर्वाधिक रुग्ण आहेत. दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांना ही चणचण भासत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ५६६ रुग्ण आढळले. त्यापैकी ३७ हजार ३०८ बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या बाधित असलेल्या १५ हजार ३७४ रुग्णांपैकी ४१६९ रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत. यातील मध्यम; परंतु ऑक्सिजनवर १२६८ रुग्ण आहेत. २६३ आयसीयू, ६३ व्हेंटिलेटरवर आणि २०३ बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत.
ऑक्सिजन : १० हजार लिटर लिक्विडचा पुरवठा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सध्या दहा हजार लिटर लिक्विडचा पुरवठा होत आहे. दररोज आठ हजार लिटर लिक्विड लागत आहे, तर जिल्ह्यात साडेतीन हजार जम्बो सिलिंडर लागत आहेत. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनची चणचण भासत आहे; परंतु आरोग्य प्रशासन मोठी कसरत करून ऑक्सिजन मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. शासकीय महाविद्यालयात सर्वाधिक रुग्ण असल्याने तेथे पुरवठा आहे.
रेमडेसिविर : न्यायिक पद्धतीने रेमडेसिविरचा होतो पुरवठा
ज्या रुग्णांना गरज आहे, अशा रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून, न्यायिक पद्धतीने या इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसला तरी न्यायिक पद्धत अवलंबली जात असल्याने गरजू रुग्णांना मिळावे म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. दररोज न्यायिक पद्धतीने या इंजेक्शनचे वाटप केले जात आहे.
लसीकरण : साठा नसल्याने केवळ ९९ केंद्रे सुरू
जिल्ह्यातील लसींचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. १७१ केंद्रांपैकी कालपर्यंत फक्त ९९ केंद्रांवर जेमतेम १२०० ते १३०० डोस उपलब्ध होते. प्रशासनाने १ लाख ८० हजार डोसची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८९ हजार १८८ व्यक्तींनी लस घेतली आहे. यातील १६ हजार १७० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. मात्र, लसीचा तुटवडा आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात सुरू असतानाच कोरोना प्रतिबंधक लसीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. प्रारंभी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, काही उपकेंद्रे आणि खाजगी मिळून १९१ केंद्रांवर लस दिली जात होती; परंतु पुरवठा कमी झाल्यामुळे सध्या ७१ केंद्रांवर लस देणे सुरू आहे. जिल्ह्यात १५ ते २० हजार डोस दिवसाला देण्याची क्षमता आहे. मात्र, लसीचा प्रचंड तुटवडा आहे.