अहमदपूर, चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:26+5:302021-05-13T04:19:26+5:30
अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने काही रुग्णांना ऑक्सिजनविना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अहमदपूर व चाकूर ...

अहमदपूर, चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारणार
अहमदपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने काही रुग्णांना ऑक्सिजनविना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अहमदपूर व चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढली असून मे महिन्याच्या शेवटी हा प्लांट कार्यरत होईल, असे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे रुग्ण संख्या वाढली. परिणामी, अहमदपूर व चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन सिलिंडर लातूरहून पुरवठा करण्यात येतात. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मागणी व पुरवठ्यात तफावत येत होती. ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा नियोजन व विकास कार्यक्रमाअंतर्गत २२ लाखांच्या किमतीच्या प्रत्येकी दोन ऑक्सिजन जनरेटरची मागणी केली आहे. दिल्लीतील कंपनीकडून ही मशिनरी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अहमदपूर व चाकूर ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात येणार आहे.
त्यासाठी केवळ १० बाय १० मीटर जागा लागणार असून ती दोन्ही रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे या प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. येत्या महिन्यापासून त्यातून दर २४ तासाला १०० लिटर प्रत्येक मिनिटप्रमाणे अथवा २४ तासांत २२ जम्बो सिलिंडर भरण्याएवढे ऑक्सिजन तयार होणार आहे. हे ऑक्सिजन हवेतून शोषून मशिनरी तयार करणार आहेत. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना दोन्ही ऑक्सिजन जनरेटरचा उपयोग होणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी लाभदायक...
जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑक्सिजन मशीनविषयी मागील महिन्यामध्ये शिफारस केली होती. त्यास मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांत ऑक्सिजन जनरेटर मशीन अहमदपूर, चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात बसविण्यात येणार आहे. त्याचा बाधित रुग्णांना फायदा होणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
महिना अखेरीस सेवा...
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिफारशीनुसार १०० लिटर पर मिनिट क्षमतेचे दोन ऑक्सिजन जनरेटर अहमदपूर व चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या रुग्णालयातील ३० खाटांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी सांगितले.