शेती नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:21+5:302021-07-20T04:15:21+5:30
औराद शहाजानीसह परिसरातील तगरखेडा, सावरी, हलगरा, चन्नाचीवाडभ, संगारेड्डीवाडी, माने जवळगा, बोरसुरी, तांबाळा, तांबाळवाडी, शेळगी आदी गावांत रविवारी दुपारी तासभर ...

शेती नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश
औराद शहाजानीसह परिसरातील तगरखेडा, सावरी, हलगरा, चन्नाचीवाडभ, संगारेड्डीवाडी, माने जवळगा, बोरसुरी, तांबाळा, तांबाळवाडी, शेळगी आदी गावांत रविवारी दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. यात सखल भागातील शेत जमिनीवरील माती, पिके वाहून गेली. औराद येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी व या रस्त्याला जाेडणा-या रस्त्यांवरील पाण्याचे नियोजन व्यवस्थित काढून न दिल्यामुळे पाणी महामार्गावरून वाहत शेजारील दुकानात व घरांत शिरले. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य व व्यापा-यांचे नुकसान झाले.
या सर्व नुकसानीची पाहणी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, सहायक गटविकास अधिकारी चव्हाण यांनी केली. महामार्गावरील पाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्थित नाही. नाली बांधकाम अर्धवट आहे. हे पाणी गावाबाहेर काढणे गरजेचे आहे, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असून संबंधित एमएसआरडीसी व गुत्तेदारास सूचना देण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी विकास माने म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र विद्यालयाची संरक्षण भिंत वाहून गेल्याची, राजा पाटील यांच्या घराच्या नुकसानीची तसेच शेतकरी गाेरख नवाडे, रमेश थेटे यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली. महामार्गावरील तुंबलेल्या ठिकाणाची तसेच औराद, सावरी, तगरखेडा भागातील शेतकऱ्यांच्या शेतात थांबलेल्या पाण्याची पाहणी करण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे, मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील, बालाजी भंडारे, रमेश थेटे, भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, प्राचार्य वसंत पाटील, गाेरख नवाडे आदी उपस्थित हाेते.
तगरखेडा बंधा-यातील पाणी सोडून दिले...
कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांपेक्षा बांधबंदिस्ती फुटून माती वाहून गेल्याने माेठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तेरणावरील तगरखेडा उच्चस्तरीय बंधाऱ्याची पाळू कमकुवत व बंधारा छोटा असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला की दारे उघडण्याची यंत्रणा व शेड पाण्याखाली जाते. त्यामुळे जलसिंचन विभागाने बंधाऱ्यातील पाणी मांजरा नदी पात्रात कर्नाटकात साेडून दिले आहे.