अहमदपूर पाणीपुरवठ्याचा प्रगती अहवाल दररोज देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:32+5:302021-07-27T04:20:32+5:30

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी जल योजनेचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुत्तेदारास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ ...

Order to give daily progress report of Ahmedpur water supply | अहमदपूर पाणीपुरवठ्याचा प्रगती अहवाल दररोज देण्याचे आदेश

अहमदपूर पाणीपुरवठ्याचा प्रगती अहवाल दररोज देण्याचे आदेश

Next

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी जल योजनेचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुत्तेदारास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या कामासंदर्भातील दररोजचा प्रगती अहवाल सादर करण्यात यावा अन्यथा दुप्पट दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३६ महिन्यांपासून प्रलंबित आहे. अजूनही अहमदपूरकरांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याबाबत गुत्तेदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिकेच्या वादामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वारंवार बैठका घेतल्या. मात्र, त्यास गुत्तेदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज ३ हजार ८५९ रुपये दंड आकारला होता. हा दंड आकारुनही अपेक्षित परिणाम होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दररोजचा प्रगती अहवाल कार्यालयास सादर करावा व प्रगती अहवाल न दिल्यास दुप्पट दंड आकारण्यात येईल, असे पत्र पाठविले आहे. दरम्यान, संबंधित गुत्तेदारावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

गुत्तेदाराने अपूर्ण ठेवलेली कामे...

गुत्तेदाराने लिंबोटी व्हीटी पंप क्र. २ व ३ बसविणे, जलशुद्धीकरण केंद्राचे काम करणे, अशुद्ध वाहिनीची क्षमता चाचणी करणे, शहरातील चार झोनमध्ये वितरण, क्रॉस कनेक्शनची चाचणी करणे, वितरण व्यवस्थेसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करणे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक नागरिकांच्या चिखलाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. २१ लक्ष लिटरच्या जलकुंभाचे आउटलेट पाईप जोडणे, दररोजचा प्रगती अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

३० दिवसांआड पाणीपुरवठा...

लिंबोटी येथील दोन्ही पंप नादुरुस्त झाल्यामुळे व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अहमदपूरला ३० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

गुत्तेदारावर कायदेशीर कार्यवाही करा...

शहरास ३० दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गुत्तेदार जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, सरवरलाल सय्यद यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली आहे.

प्रगती अहवाल पाठविणार...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दैनंदिन प्रगती अहवाल पाठविला जाणार आहे. वेळेत काम करण्याच्या गुत्तेदारास सूचना केल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता विकास बडे यांनी सांगितले.

फिल्टरसाठी दोन महिने...

फिल्टरचे काम प्रलंबित असून त्याची जोडणी केल्यानंतर ही किमान ४० दिवस त्याचे काम चालते. त्यामुळे आणखीन दोन महिने तरी शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही. आतापर्यंतच्या कामात गती नसल्याने पाणीपुरवठ्यास उशीर होत आहे, अभियंता गणेश पुरी यांनी सांगितले.

Web Title: Order to give daily progress report of Ahmedpur water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.