गटसाधन केंद्रसमोरील मैदानावर सांस्कृतिक सभागृहास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:39+5:302021-09-10T04:26:39+5:30

येथील गटसाधन केंद्रासमोरील व्हॉलिबॉल मैदानात नाट्यगृह व सांस्कृतिक संकुल प्रस्तावित आहे. हे संकुल ज्या ठिकाणी होत आहे, तिथे मागील ...

Opposing the cultural hall on the ground in front of the group resource center | गटसाधन केंद्रसमोरील मैदानावर सांस्कृतिक सभागृहास विरोध

गटसाधन केंद्रसमोरील मैदानावर सांस्कृतिक सभागृहास विरोध

येथील गटसाधन केंद्रासमोरील व्हॉलिबॉल मैदानात नाट्यगृह व सांस्कृतिक संकुल प्रस्तावित आहे. हे संकुल ज्या ठिकाणी होत आहे, तिथे मागील १५ वर्षांपासून खेळाडू व्हॉलिबॉलचे मैदान चालवित आहेत. याठिकाणी किमान ८० विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू दररोज नियमित सराव करतात. येथील खेळाडू मागील १० वर्षांपासून विविध वयोगटात व स्तरावर शहराचा लौकिक वाढवित आहेत. दरवर्षी संघ विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी बजावत आहेत. याच ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील सामने खेळविण्यात आले आहेत.

नाट्यगृह, सांस्कृतिक सभागृह ही शहराची गरज आहे. जेणेकरून शहरातील नागरिक, रसिकांची सांस्कृतिक भूक भागविली जाईल. पण, शहरातील शिल्लक असलेल्या मोजक्या दोन मैदानांवर सभागृह उभारणे योग्य नाही. नाट्यगृहासाठी शहरात भरपूर जागा उपलब्ध आहे. त्यापैकी कुठलीही जागा प्रशासन वापरु शकते. शहरातील नागरिक व खेळाडूंसाठी मैदानाची खूप गरज आहे. यापूर्वी शहरातील सर्व खुल्या जागांवर विविध स्वरुपाची बांधकामे करण्यात आली आहेत. शहरात सध्या केवळ दोन मैदाने उपलब्ध आहेत. त्यापैकी हे मैदान आहे.

प्रस्तावित नाट्यगृह आणि सांस्कृतिक संकुल शहरातील अन्य ठिकाणी निर्माण करून गटसाधन केंद्रासमोरील व्हॉलिबॉलचे मैदान विद्यार्थी, खेळाडूंसाठी मोकळे असू द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी अजित शिंदे, महेश धुमाळे, खान महेमुद, अरविंद सूर्यवंशी, संदीप पवार, विशाल आदेप्पा, गोविंद तोसळवड, आनंद जगताप, सिकंदर आडे, जहागीरदार शाहीद, शेख वाजीद, बुधभूषण सोनकांबळे, अस्मिता जाधव, आदिती मुळे, अपूर्वा जळकोटे, साक्षी कांबळे, खान अर्शद यांच्यासह उदयगिरी क्रीडा मंडळाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Opposing the cultural hall on the ground in front of the group resource center