रेणापूर तालुक्यात नवीन चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:02+5:302021-01-19T04:22:02+5:30
तालुक्यातील २८ पैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तसेच २२ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तालुक्यातील पोहरेगाव जिल्हा ...

रेणापूर तालुक्यात नवीन चेहऱ्यांना संधी
तालुक्यातील २८ पैकी फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तसेच २२ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तालुक्यातील पोहरेगाव जिल्हा परिषद गटात २, खरोळा गटात ८, पानगाव गटात ४, कामखेडा गटात ४ अशा १७ ग्रामपंचायतींवर काँग्रेस प्रणीत पॅनेलच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. सहा ग्रामपंचायतींमध्ये भाजप पॅनेल प्रणीत सदस्य निवडून आले. तसेच एका ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी- काँग्रेस प्रणीत पॅनेलचे बहुमत झाले आहे. मनसे प्रणीत पॅनेलच्या सदस्यांनी दोन ग्रामपंचायतींवर प्रथम ताबा मिळविला आहे.
भाजपच्या जिल्हा परिषद सभापती संगीता घुले व भाजप ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब घुले, भाजपचे माजी पं. स. सदस्य संपत कराड, खरोळा गटाचे सदस्य सुरेंद्र गोडभरले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष हणमंत पवार, सलग १५ वर्षे सरपंच काँग्रेसचे गंगाधर घोडके यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, भाजपच्या पं .स. सदस्या संध्या पवार, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. भाजपचे सभापती रमेश सोनवणे यांच्या पोहरेगाव गणामधील ३ पैकी ३ ग्रामपंचायतींवर भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
खरोळ्यातील विजयी उमेदवार...
तालुक्यातील खरोळा ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार- धनंजय देशमुख, सारिका आडतराव, इनायतअली शेख, अनिल गिरी, रजियाबी तांबोळी, राणी धबडगे, विश्वनाथ कागले, दैवशाला राऊतराव, तमण्णा शिकलकर, राहुल कांबळे, शारदा सप्ताळ, जनाबाई रवळे, पांडुरंग आदुडे, सदानंद पिंपळे, लक्ष्मण शिंदे हे आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी भेट दिली.