अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:23+5:302021-05-29T04:16:23+5:30
बाजार अभियानासाठी शेतकऱ्यांना आवाहन लातूर : विकेल ते पिकेल, या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानात ...

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी
बाजार अभियानासाठी शेतकऱ्यांना आवाहन
लातूर : विकेल ते पिकेल, या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानात जास्तीत जास्त शेतकरी गटातील सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी गटातील शेतकरी जे महामार्गावर, स्वत:च्या स्टॉलवर सहकारी सोसायटीमध्ये, हातगाड्यांवर तसेच आठवडी बाजारामध्ये भाजीपाला, फळे थेट ग्राहकास विक्री करतात, अशा शेतकरी गटातील शेतकरी सदस्यांनी ७ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून उपचार
लातूर : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजारावरील उपचाराकरिता मोठा खर्च पडतो. त्यामुळे शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार तीन रुग्णालयांत या योजनेतून म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार दिले जाणार आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, विवेकानंद रुग्णालय या तीन संस्थांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील.
वाटणीच्या कारणावरून लाथाबुक्क्याने मारहाण
लातूर : जागेच्या वाटणीच्या कारणावरून राहुल नगर, गौसपुरा येेथे मारहाण झाल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात जाज इलाही सय्यद (रा. राहुल नगर, गौसपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खाजामियाँ उमरसाब शेख व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. पाटील करीत आहेत.
भाजपाच्यावतीने गावोगावी सेवा कार्य
लातूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र शासनाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोनाच्या अनुषंगाने सेवाकार्य केले जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी दिली. जिल्ह्यातील ५ विधानसभेच्या १२ मंडळातील प्रत्येक गावात भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी भेटी देऊन आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करणार आहेत. रक्तदान शिबिर, साफसफाई, स्वच्छता अभियान, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप, तुळशीच्या रोपाचे वाटप, बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत जनजागृती आदी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती आ. कराड यांनी दिली.