हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:40+5:302021-05-26T04:20:40+5:30

लातूर/ अहमदपूर : यंदाच्या रबी हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ...

One month extension for purchase of gram | हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ

हरभरा खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ

लातूर/ अहमदपूर : यंदाच्या रबी हंगामात आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठी २५ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांना हरभरा विक्री करता आला नाही. त्यातच बाजारपेठेत दरही घसरले होते. त्यामुळे मुदतवाढीची मागणी होत होती. केंद्र सरकारने २५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जलसाठे भरले होते. त्यामुळे यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता. तसेच उत्पादनही चांगले मिळाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यात अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राऐवजी बाजार समित्यांत हरभऱ्याची विक्री करण्यास सुरुवात केली.

जिल्ह्यातील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर एकूण १६ हजार १२३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु, २५ फेब्रुवारीपासून गत आठवड्यापर्यंत प्रत्यक्षात केवळ ३ हजार २१ शेतकऱ्यांचा ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. बाजार समितीत अधिक दर असल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. दरम्यान, गत आठवड्यापासून अचानकपणे हरभऱ्याच्या दरात घसरण होऊ लागली. प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना ३०० ते ४०० रुपयांचा फटका बसू लागल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळू लागले. परंतु, २५ मे पर्यंतच मुदत असल्याने आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येऊ लागली होती. मंगळवारी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या.

मुदतवाढीसाठी पाठपुरावा...

लॉकडाऊन आणि बाजारपेठेतील घसरलेले दर पाहून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन आ. बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करुन पाठपुरावा सुरु केला होता. अखेर एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२४ कोटींचा हरभरा खरेदी...

यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यातील १६ केंद्रांवर गत आठवड्यापर्यंत ४६ हजार ६५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ कोटी वर्ग करण्यात आले आहेत. आता एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असून २५ जूनपर्यंत खरेदी केंद्र सुरू राहणार असल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय.ई. सुमठाणे यांनी सांगितले.

Web Title: One month extension for purchase of gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.