मराठा आरक्षणासाठी नांदगाव येथे एकाने जीवन संपवले; लातूरातील आतापर्यंतची पाचवी घटना
By संदीप शिंदे | Updated: November 4, 2023 18:58 IST2023-11-04T18:56:23+5:302023-11-04T18:58:07+5:30
सरकारकडून आरक्षणासाठी केवळ आश्वासन मिळत असल्याने मराठा आरक्षण मिळेल की नाही या निराशेतून केली आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी नांदगाव येथे एकाने जीवन संपवले; लातूरातील आतापर्यंतची पाचवी घटना
चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील नांदगाव येथे मराठा आरक्षणासाठी एका ५३ वर्षीय व्यक्तीने शनिवारी पहाटे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तुकाराम रघूनाथ मोरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नांदगाव येथील तुकाराम मोरे हे भूमिहीन आहेत. शेतमजूरी करुन कुटूंबाचा गाडा ते चालवित होते. दरम्यान, मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने तरुणांची हेळसांड होत असल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यातच सरकारकडून आरक्षणासाठी केवळ आश्वासन मिळत असल्याने मराठा आरक्षण मिळेल की नाही या निराशेतून त्यांनी शनिवारी पहाटे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक साहेबराव नरवाडे, पोलिस उपनिरिक्षक राजाभाऊ घाडगे, पोहेकॉ ईश्वर स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मयत तुकाराम मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.