आधार प्रमाणीकरणाअभावी दीड हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:25+5:302021-04-17T04:18:25+5:30
लातूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ६५ ...

आधार प्रमाणीकरणाअभावी दीड हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित !
लातूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ६५ हजार ७७० शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असून, यापैकी ५७ हजार ३३८ जणांना ३३८ कोटी २७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळालेली आहे, तर आधार प्रमाणीकरण नसल्याने १ हजार ५७८ शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत.
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेला वर्षभराचा कालावधी होत आला असला तरी दीड हजार शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक कर्जपासून वंचित राहावे लागले आहे. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी ६५ हजार ७७० शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी ५८ हजार २९७ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. तर ५७ हजार ३३८ शेतकऱ्यांना ३३८ कोटी २७ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. तर १ हजार ५७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या सर्वच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी कर्जपुरवठा करण्यात यावा, असा शासनाचा आदेश असला तरी अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. शासनाच्या वतीने उद्दिष्ट देऊनही अपेक्षित कर्ज वाटप होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. आधार प्रमाणीकरण रखडलेल्या शेतकऱ्यांशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावस्तरावर संपर्क साधला जात असून, ज्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे, त्यांनी जवळील सेतू सुविधा केंद्रावर जाऊन योजनेच्या संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
३८९ तक्रारींचे तहसीलस्तरावर निवारण...
कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तहसीलस्तरावर तक्रार करता येते. त्यानुसार ९५८ तक्रारी विविध तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३८९ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर १०४ प्रकरणे तहसील स्तरावर प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ६५ हजार ७७० पात्र शेतकरी असून, यापैकी ५८ हजार २९७ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
३३८ कोटी २७ लाख कर्जखात्यावर वर्ग...
पात्र असलेल्या ६५ हजार ७७० शेतकऱ्यांपैकी ५८ हजार २९७ जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले असल्याने यापैकी ५७ हजार ३३८ कर्जखात्यावर शासनाच्या वतीने ३३८ कोटी २७ लाख रुपये कर्जमुक्तीपोटी वर्ग करण्यात आले आहेत. पात्र असलेल्या सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.