कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भाड्याने घराचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:37+5:302021-07-10T04:14:37+5:30
चाकूर : दोनदा आदेश काढूनही तालुका कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कार्यालयीन हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे ...

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भाड्याने घराचा शोध सुरू
चाकूर : दोनदा आदेश काढूनही तालुका कृषी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कार्यालयीन हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे मुख्यालयी राहणाऱ्यांनी वास्तव्याचा दाखला सादर करावा. अन्यथा पुढील महिन्यापासून देय असलेले घरभाडे भत्ता अदा केला जाणार नाही. मुख्यालयी न राहणाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आदेश तालुका कृषी अधिकारी बी.आर. पवार यांनी काढले आहेत. त्यामुळे कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी भाड्याच्या घराचा शोध घेत आहेत.
चाकुरात तालुका कृषी कार्यालय असून तालुक्यातील २३ गावात कृषी सहाय्यक आहेत. त्यांच्या माध्यमातून योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्यावर नियंत्रणासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आहेत. परंतु, येथील कृषी विभागातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कार्यालयात चौकशी केली असता साहेब आताच ट्रेझरीला गेलेत, असे उत्तर मिळते. त्यामुळे खेड्यातून आलेल्या शेतकऱ्यांना आल्या पावली माघारी जावे लागते. त्यातच तालुका कृषी अधिकाऱ्यांवर अहमदपूर तालुका कृषी अधिकारी पदाचा भार आहे.
चाकूर तालुक्यासाठी एक तालुका कृषी अधिकारी, दोन मंडळ कृषी अधिकारी, एक कृषी अधिकारी, ५ कृषी पर्यवेक्षक, २५ कृषी सहाय्यक, एक आत्माचा कर्मचारी, एक शिपाई अशी पदे आहेत. चाकूर व घरणीसाठी मंडळ कृषी अधिकारी असून त्यांचे मुख्यालय चाकूर आहे. कृषी पर्यवेक्षक चाकूरसाठी दोन, जानवळ, नळेगाव, घरणी येथे आहे. कृषी सहाय्यक सुगाव, उजळंब, हिप्पळनेर, नळेगाव, बोथी, रोहिणा, चापोली, शेळगाव, झरी (खु.), अजनसोंडा (बु.), हाळी (खु.), घरणी, मोहनाळ, आष्टा, महाळंगी, झरी (बु.), शिवणखेड, जानवळ, गांजूर, वडवळ (नागनाथ), महाळंग्रा, सांडोळला आहेत. परंतु, बहुतांश कृषी सहाय्यक मुख्यालयी राहत नाहीत.
तालुक्यातील सर्वच कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरी असावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे म्हणून चाकूर संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन धरण्यात आले होते. तेव्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहत असल्याचा दाखला सादर करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुन्हा ५ जुलै रोजी असाच आदेश दुसऱ्यांदा काढण्यात आला.
घरभाडे भत्ता अदा केला जाणार नाही...
कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांसह सर्वांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. त्यांना दोनदा लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. बैठक घेऊन अंतिम सूचना दिली जाईल. त्यानंतर कोणी मुख्यालयी राहत नसले तर घरभाडे भत्ता अदा केला जाणार नाही. तसेच त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव पाठविला जाईल.
- बी.आर. पवार, तालुका कृषी अधिकारी.
आढावा घेतला जाईल...
तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पुन्हा सर्व प्रमुखांची तहसील कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला जाईल.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार